प्रशासनावर नाराजी, आरोंदा सरपंचांसह सदस्यांनी घेतला टोकाचा निर्णय

रुपेश हिराप
Friday, 31 July 2020

जर प्रशासन सहकार्य करीत नसेल तर ग्रामपंचायत सदस्यपदाचा आणि कृती समितीचा राजीनामा देणेच योग्य, असे एकमत सरपंच व सर्व सदस्यांचे झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी अखेर सावंतवाडी सभापती सौ. धुरी यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आरोंदा गावातील क्‍वारंटाईन व्यक्ती तेरेखोल खाडीत अन्य एकासोबत फिरत असल्याबाबत व ती व्यक्ती गावातही फिरत असल्याचे वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आरोंदा सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती सभापतींकडे राजीनामे सोपवले. 

या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आरोंदा गावात भेट देत त्या संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश संबंधिताला दिला. दाखल झालेल्या गुन्हाचा निकाल लागत नाही तोपर्यंत संबधित व्यक्तीला शासनाकडून मिळणारे रेशनिंग धान्य बंद केल्याचे त्यांनी सांगितले. आरोंदा येथे क्‍वारंटाईन असलेली व्यक्ती सरपंच उमा बुगडे यांना धमकी देत असूनही प्रशासन फक्त गुन्हा नोंद करण्यापलीकडे काहीच करत नाही.

संबंधित क्‍वारंटाईन व्यक्ती गावात फिरत असून जर कोरोना संसर्ग वाढल्यास त्याला जबाबदार कोण? त्यामुळे आरोंदावासीय भीतीच्या छायेत आहेत. जर प्रशासन सहकार्य करीत नसेल तर ग्रामपंचायत सदस्यपदाचा आणि कृती समितीचा राजीनामा देणेच योग्य, असे एकमत सरपंच व सर्व सदस्यांचे झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी अखेर सावंतवाडी सभापती सौ. धुरी यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. 

सावंतवाडी सभापती सौ. धुरी यांनी सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांची भेट घेऊन याविषयावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसार तहसीलदार म्हात्रे यांनी आरोंदा गावात परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी गावात जाऊन ग्रामपंचायत प्रशासन व सहनियंत्रण समितीची बैठक घेतली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, सभापती मानशी धुरी उपस्थित होते. 

तोडग्यासाठी बैठक ः सभापती 
बैठकीत झालेल्या चर्चेत संबधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सुचना श्री. म्हात्रे यांनी केली. तसेच जोपर्यंत गुन्ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत संबधित व्यक्तीला शिधावाटप पत्रिका सील करून रेशनिंगवरील धान्य देऊ नये, अशी सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, तहसीलदार म्हात्रे यांच्या निर्णयामुळे गावातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्‍यात आली असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या राजीनाम्याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार येणार असल्याचे सभापती धुरी यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Members resign with Aronda Sarpanch konkan sindhudurg