esakal | दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांचा संताप ; खेडमध्ये  तणावाचे वातावरण,अधिकारी धारेवर
sakal

बोलून बातमी शोधा

Merchants angry over market downturn lockdown impact kokan marathi news

गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खेड तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांचा संताप ; खेडमध्ये  तणावाचे वातावरण,अधिकारी धारेवर

sakal_logo
By
सिध्देश परशेट्ये

खेड (रत्नागिरी)  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु होताच संभ्रमावस्थेत गेलेल्या खेडमधील व्यापारीवर्गाने संताप व्यक्त केला. दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाने पोलीसी बळाचाही वापर केला. मात्र त्यामुळे चिडलेल्या व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशासकिय अधिकाऱ्यांशी वादावादी करत दुकाने बंद केली तर आमच्या नोकरांचा पगार कोण देणार असे प्रतिप्रश्न उपस्थित केले. त्यामुळे खेड शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खेड तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने काल शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ या दरम्यान कडक लॉकडाऊन घोषीत केले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला व्यापाऱ्यांचीही संमत्ती होती मात्र आज अचानक सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास खेडचे प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, तहसिलदार श्रीमती प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक श्रीमती निशा जाधव, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खेड बाजारपेठेत जावून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सुरवात केली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सुरवात केल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. संतप्त झालेल्या व्यापा-यांना दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे शहरातील व्यावसायिक आणखीनच संतप्त झाले. दुकाने बंद ठेवायला सांगत असाल तर आमच्या दुकानांची आणि घरीची विजेची बिले, दुकानात काम करणाऱ्या कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे, व्यापांची देणी द्यायची कशी? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला.

खेड बसस्थानक परिसर, बाजारपेठ, तीनबत्ती नाका येथील दुकाने प्रशासकीय अधिका-यांनी पोलीस दलाचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न केल्याने व्यापारी आणि अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी अधिकारी दुकाने बंदा न करता निघून गेले मात्र व्यापाऱ्यांना कारवाईची धमकी दिल्याने व्यापारी संतप्त झाले. शहरात अचानक सुरु झालेली कारवाई पाहून शहरात खरेदीसाठी आलेला ग्राहकवर्ग देखील आल्या पावली निघून गेला त्यामुळे कारवाई सुरु होताच बाजारपेठत शुकशुकाट पहावयास मिळाला.

लाॅकडाऊनच्या नियमावलीबाबतच्या संभ्रमावस्थे मुळे खेड शहरातील व्यापारी वर्गाने शासनाचा निषेध नोंदवला. येथील व्यावसायिक संजय भाट यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, अचानक लाॅकडाऊन झाल्यामुळे  व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे या नुकसानीला जबाबदार कोण ? गतवर्षी झालेल्यालाॅकडाऊन मूळे व्यापारीवर्ग याआधीच मेटाकुटीस आलेला आहे. पुन्हा लाॅकडाऊनची परिस्थिती आल्यामुळे व्यापारी हतबल झालेला आहे. 

संपादन- अर्चना बनगे

loading image