कोट्यावधी किमतीची काजू कलमे सिंधुदुर्गात पडून

भूषण आरोसकर
शनिवार, 13 जुलै 2019

सावंतवाडी - रोपवाटिकांनी काजु कलमांचे केलेले विक्रमी उत्पादन, लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत काजू बागायतीचे घटलेले आकर्षण यामुळे जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांची काजू कलमे पडून आहेत. यामुळे नर्सरी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

सावंतवाडी - रोपवाटिकांनी काजु कलमांचे केलेले विक्रमी उत्पादन, लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत काजू बागायतीचे घटलेले आकर्षण यामुळे जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांची काजू कलमे पडून आहेत. यामुळे नर्सरी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नर्सरीधारक आहेत. आंबा बागायती नव्याने करण्याकडे लोकांचा कल घटल्यामुळे त्यांच्या व्यवसाय काजू कलमावर चालतो. गेल्यावर्षी जिल्ह्यात काजु कलमांची विक्रमी लागवड झाली. पडीक क्षेत्रात फळझाड लागवड करण्याचे शासनाच्या उद्देशाला अनेक शेतकऱ्यानी प्रतिसादही दिला; मात्र यंदा काजु कलमांची खरेदी व विक्री रोडावली आहे.

गेल्यावर्षी काजु बीला प्रतिकिलो दीडशे ते एकशे सत्तर इतका दर मिळाला होता. यामुळे काजू लागवडीकडे लोकांचा ओघ वाढला होता. शेतकऱ्यांबरोबरच व्यावसायिक, नोकरदार यांनीही काजु कलमांची विक्रमी लागवड केली; मात्र यंदा काजु बीचा शंभरवर आला. त्याचा थेट परिणाम काजू लागवडीवर झाला. गेल्यावर्षी काजू कलमे कमी पडली. दरही चांगला मिळाला. यामुळे व्यावसायिकांनी यंदासाठी क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त काजूू कलमांची निर्मिती केली.

लांबलेल्या पावसाचाही काजू लागवडीला फटका बसला. पुर्व मोसमी पावसात काजु कलमांची खरेदी होवून नर्सरीमधील कालमांची पुर्णता विक्री होत असे. जुनमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना परतुन जावे लागत असे. याचा विचार करता मोठ्या नर्सरीधारकांनी काजु कलमांचे दुप्पट-तिपटीने उत्पादन वाढविले. ज्याठिकाणी 10 हजाराचा परवाना आहे, अशा नर्सरीत 30 ते 40 हजार काजु कलमे उत्पादीत होताना दिसून आली.

यंदा उत्पादन वाढले तरी अपेक्षित ग्राहक मात्र मिळविला नाही.
शिवाय गेल्या दोन तीन वर्षात काजु कलमे निर्माण करणाऱ्या नर्सरींची संख्याही वाढली. यंदा पाऊस 10 जूनच्याही पुढे गेला. यामुळे अनेकांनी मजूरांचा अभाव व इतर कारणामुळे यंदाची लागवड रद्द केली. यंदा घटलेला दर पाहून बऱ्याच जणांनी काजूमधील गुंतवणूक थांबवली. याचा थेट परिणाम काजू कलमांच्या विक्रीवर झाला.

जिल्ह्यात साधारणपणे छोटे काजूचे रोप 60 रूपयांनी विकले जायचे तर मोठे रोप 100 रुपयांनी विकण्यात यायचे; मात्र यंदाची स्थिती पहाता मोठ्याची रोपांची विक्री 50 ते 60 रुपयांवर आणण्याची वेळ नर्सरीधारकांवर आली. पुढील वर्षीही हिच स्थिती राहणार असल्याचे भितीही नर्सरीधारकांकडून वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या कोट्यावधी किमतीची काजू कलमे पडून आहेत. ती एक वर्ष ठेवायची झाल्यास उत्पादन खर्च वाढणार आहे. शिवाय मोठी रोपे आणखी वर्षभर ठेवणेही कठीण आहेत. या सगळ्यामुळे नर्सरीधारकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

गणित कोलमडले
काजु कलमांची रोडावलेली विक्री पहाता निम्या दरापर्यंत काजु कलमे विकण्याची वेळ आली असल्याचे नर्सरीधारकांकडून सांगण्यात येत आहे. यंदाच्या हंगामातील कलमे पडून आहेत. पुढील वर्षाची तयारी म्हणून याआधीच नव्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. एका रोपाला वर्षभर पोसण्यासाठी साधारण 30 रूपये खर्च येतो. पुढच्या वर्षी खरेदी किती होईल हे सांगणे कठीण आहे. यामुळे नर्सरीधारकांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.

""काजु कलमांना यंदा बराच कमी दर मिळाला असून काजु कलम लागवडीसाठी असलेली अनेकांची उमेद कमी झाली आहे. जिल्ह्यातील कारखानदारच स्थानिक काजुची पुरेशी मागणी करीत नाही. ती होणे गरजेचे आहे. काजुला चांगला दरही मिळणे गरजेचे आहे. पुढील वर्षीही हीच स्थिती दिसूून येण्याची भीती आहे.''
- जगदेव गवस,
नर्सरीधारक नेतर्डे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of cashew nuts seedlings fall in Sindhudurga