चाकरमान्यांनो, कृषी पर्यटनाच्या नव्या धोरणाचे करा स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minal Oak Comment On Agro Tourism New Policy

कृषी पर्यटन हा व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून फायद्याचा मार्ग आहे. त्यामुळे कृषी पर्यटन महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात त्याचे महत्त्व अधिक, कारण त्यासाठी येथे अनुकूल वातावरण आहे. 

चाकरमान्यांनो, कृषी पर्यटनाच्या नव्या धोरणाचे करा स्वागत

रत्नागिरी - शहरांकडे स्थलांतरित झालेले अनेक चाकरमानी कोरोनाच्या परिणामामुळे कोकणात परतले आहेत. ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन आहे त्यांना उदरनिर्वाहासाठी कृषी पर्यटनाचा अवलंब करणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यापैकी अनेकजण या हंगामात शेतीत काम करीत आहेत. कृषी पर्यटन हे त्यापुढील एक पाऊल आहे. त्यासाठी सरकारने काही धोरणे आखली आहेत याचे स्वागत करायला हवे, असे प्रतिपादन चिपळूण येथील प्रा. मिनल ओक यांनी केले. 

ओक या कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या माध्यमातून तीन जिल्ह्यांमध्ये काम करीत आहेत. सरकारी धोरणात कोकणातील कृषी पर्यटनासाठी काय आवश्‍यक आहे हे सांगताना त्या म्हणाल्या, आजवर कृषी पर्यटनाचे वेगळे ठोस धोरण नव्हते. आता ते आले याचे स्वागत. आज कृषी पर्यटन या शाश्वत जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. अनेक महिने घरातच अडकून राहिलेली माणसं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नक्कीच निसर्गाचा स्वच्छंद अनुभव, शुद्ध प्राणवायू, शुद्ध व सात्विक आहाराचा आनंद घ्यायला घराबाहेर पडणार आहेत. कृषी पर्यटन हा व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून फायद्याचा मार्ग आहे. त्यामुळे कृषी पर्यटन महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात त्याचे महत्त्व अधिक, कारण त्यासाठी येथे अनुकूल वातावरण आहे. 

त्या म्हणाल्या, कोकणची भौगोलिक स्थिती आणि नैसर्गिक उपलब्ध संसाधनामुळे पाहता, प्रामुख्याने कृषी पर्यटनाला उत्तम भवितव्य आहे. कोकण विकासासाठी वेगळी योजना, पॅकेजस्‌, सवलती देऊन शासनाच्या सहभागाने पर्यटन उद्योग पुनरुज्जीवित केले पाहिजेत. देशाच्या बजेटमध्ये कोकण दिसलं पाहिजे हे खासदार सुरेश प्रभू यांचे मत लक्षात घेतले पाहिजे. कृषी पर्यटन कशा प्रकारचे पद्धतीचे असावे असे शासकीय धोरण वा मार्गदर्शिका ही तळागाळातील परिस्थिती आणि कृषी पर्यटन वाढण्यासाठी तेथे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

उपक्रमांना चालना मिळाली पाहिजे 
सजगतेने व जबाबदारीने, नीतिनियमांचे पालन करण्याचा हा पर्यटन प्रकार आहे. पर्यटक आकर्षित होतील अशा गोष्टींची उभारणी, नियोजन करण्यात यावे. पर्यटकांनी खरेदी करण्यासाठी स्थानिक वस्तू, कलाकृती अशा अनेक उपक्रमांना कृषी पर्यटनात धोरणातून चालना मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा ओक यांनी व्यक्त केली.