आणखी दोन खाणी "रडारवर' 

mining issue sonurli konkan sindhudurg
mining issue sonurli konkan sindhudurg
Updated on

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सोनुर्ली, वेत्ये येथे एका अनधिकृत दगड खाणीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी दोन दगड खाणीत परवानगीशिवाय दगड उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही दगड खाणीतून रॉयल्टी न भरताच उत्खनन केल्याचे नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे अहवाल सादर केला असून ते कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागून आहे. 

सोनुर्ली, वेत्ये तसेच इन्सुली भागात गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन सुरू आहे. याठिकाणी अनधिकृत दगड उत्खनन सुरु असल्याचा आरोप अनेक सामाजिक, राजकीय तसेच जागृत नागरिकांकडून आजही होत आहे. वेळोवेळी यासंदर्भात कारवाईची मागणी होत आहे; मात्र महसूल विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने महसूलच्या यंत्रणेवर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

घटनास्थळी आजही एकाच्या परवानगीवर दुसऱ्याकडूनही दगड उत्खनन केले जात असल्याचा आरोप होत आहे. अधिकृत अशा मोजक्‍याच दगडखाणी तेथे आहेत; मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी अनेक दगड खाणी कार्यरत आहेत. यामागचे गौडबंगाल आजही महसुल यंत्रणेला समजले नाही. वेत्ये, सोनुर्ली भागात असलेल्या बरेच दगड खाणी या गोव्या राज्यातील व्यक्तींकडून चालविल्या जातात; मात्र देखरेख व इतर सर्व जबाबदारी ही स्थानिक व्यक्तींकडून उचलली जाते. त्यामुळे या स्थानिक व्यक्तींकडून राजकीय वजन वापरुन याठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाचा महसुल बुडविला जात आहे. 

अलीकडेच तहसीलदार म्हात्रे यांनी अनधिकृत दगडखाणीचा पर्दाफाश करतानाच संबंधिताला 43 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे याठिकाणी अनधिकृत दगड खाणे सुरू असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले होते. आजही चोरट्या मार्गाने याठिकाणी दगड उत्खनन केले जाते. सोमवारी तहसीलदार श्री. म्हात्रे यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार आणि त्यांच्या टीमने वेत्ये, इन्सुली तसेच सोनुर्ली भागातील दगड खाणीच्या परिसरात पाहणी केली. त्याठिकाणी दोन दगडखाणी परवानगीशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित दोन्ही दगडखाणी राजकीय व्यक्तींशी संबंधित असून त्यांना दगड उत्खननाबाबत कोणतीही परवानगी न मिळताच त्यांनी गेली दोन तीन महीने दगड उत्खनन केले आहे. 

सोमवारी बांद्याचा बाजार असल्याने कामगारांना सुटी असते; मात्र खाणीत उत्खनन झाले होते. या खाणी लीजवर असल्या तरी उत्खननाची परवानगी आवश्‍यक आहे; मात्र असे न करताच त्याठिकाणी उत्खनन झाले आहे. चौकशीत त्या खाणी राजकीय व्यक्तीच्या असल्याचे समोर आले. खाण परिसरात संबंधित परवानाधारक व्यक्तीने कंपनीच्या नावासह परवाना नंबर असलेला बोर्ड लावणे गरजेचे आहे; मात्र कोणतेही नियम याठिकाणी पाळले जात नाहीत. या सर्व गोष्टींचा अहवाल सादर केला असून तहसीलदार योग्य भूमिका घेतील. 
- प्रदीप पवार, नायब तहसीलदार 

दंडात्मक कारवाईची शक्‍यता 
वेत्ये, सोनुर्ली भागात परवानगी न मिळताच उत्खनन केलेल्या दोन्ही दगड खाणी लीजवर घेण्याची प्रक्रिया याआधी झाली आहे; मात्र यावर्षी दगड उत्खननाची परवानगी त्यांना अद्याप मिळाली नाही. असे असताना त्यांनी हे उत्खनन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे झालेल्या एकुण उत्खननावर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार संबंधितांवर आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com