'गुन्हेगाराला पाठिंबा देण्यापेक्षा भाजपने लोकहितासाठी आंदोलन उभारावे'

मुझफ्फर खान
Saturday, 7 November 2020

गुन्हेगाराला पाठिंबा देण्यासाठी जर भाजप राज्यव्यापी आंदोलन उभे करत असेल तर ते दुर्दैवी आहे

चिपळूण - ज्याच्यामुळे दोन आत्महत्या झाल्या. दोन जीव गेले. कुटुंब उद्धवस्त झाले आशा गुन्हेगाराला पाठिंबा देण्यासाठी जर भाजप राज्यव्यापी आंदोलन उभे करत असेल तर ते दुर्दैवी आहे. भाजपने कधी जनहितासाठी एखादे आंदोलन उभे केलेले आमच्या ऐकिवात नाही. आम्ही ते बघितलेले नाही. गुन्हेगाराला पाठिंबा देण्यापेक्षा लोकहितासाठी भाजपने आंदोलन उभारावे आशा शब्दात जलसंपदा मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

मंत्री जयंत पाटील शनिवारी चिपळूणमध्ये आले होते. अर्णव गोस्वामी यांच्यावरील हक्कभंग संदर्भात ते म्हणाले, हक्कभंग हा विधिमंडळाचा अधिकार आहे. विधिमंडळाला काही स्वतंत्र अधिकार आहेत. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नाही. याप्रकरणी गोस्वामी यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली असेल तर ती एक वेगळी कायदेशीर बाब आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली. मृत्युपत्र लिहून ठेवले आणि त्यामध्ये अर्णव गोस्वामीसह अन्य दोघांची नावे होती. नाईक कुटुंबाने सतत न्यायाची मागणी केली. प्रथम पोलिसांनी अर्णव यांच्याकडे जाऊन त्यांचा जबाब घेतला. नंतर नाईक कुटूंबाने पुन्हा तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला त्यावेळी तथ्य आढळल्यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये राज्यसरकरचा सबंध येतोच कुठे? असेही ते म्हणाले.
 

एका कुटुंबातील दोघेजण मृत्युमुखी पडले. एक कुटुंब उद्धवस्त झाले. त्याला कारणीभूत असलेल्या गुन्हेगाराला पाठींबा देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत असेल तर हे दुर्दैवी आहे. त्यापेक्षा जनहितासाठी भाजपने एखादे आंदोलन हाती घ्यावे. आपण काय करतोय याचे भान भाजपला असायला हवे. असा खोचक टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

हे पण वाचाकोल्हापुरच्या राजकारणाची दिशा बदलणार ; तीन नेते येणार एकत्र ? 
 

मराठा आरक्षण संदर्भात ते म्हणाले, अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. मराठा अरक्षणासदर्भात ते अधिक लक्ष देऊन काम करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आम्ही सर्वचजण त्याविषयी एक टीमवर्क म्हणून काम करत आहोत. न्यायालयात देखील मजबुतीने बाजू मांडण्याची तयारी सरकारने केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणारच असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister jayant patil criticism on bjp in chiplun