कणकवलीत भाजप जिंकणार कसे? - राज्यमंत्री चव्हाण

कणकवलीत भाजप जिंकणार कसे? - राज्यमंत्री चव्हाण

कणकवली - भाजपसाठी दोन तास देखील वेळ देण्यास कुणी तयार नाही. ऑनलाईन मतदार नोंदणी कशी करतात ते माहिती नाही. कुणाकडेच सदस्यता फॉर्म नाही अशीच परिस्थिती राहणार असेल तर कणकवली मतदारसंघ कधीच जिंकू शकत नाही, अशी खंत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्‍त केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाशी युती होईल किंवा होणार देखील नाही; मात्र कार्यकर्त्यांनी स्वबळासाठी तयार राहायला हवे. त्यासाठी प्रत्येक बूथप्रमुखाने १०० आणि कणकवली मतदारसंघात किमान २५ हजार मतदान नोंदणी व्हायलाच हवी, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात भाजपचा बूथप्रमुख मेळावा झाला. यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

याखेरीज प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, प्रज्ञा ढवण, जयदेव कदम, प्रमोद रावराणे आदी पदाधिकाऱ्यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पक्षसंघटनेसाठी सकाळच्या सत्रात दोन तास काम करण्यासाठी केवळ तिघांनी हात वर केलेत. दुपारी, सायंकाळी आणि रात्री काम करायला कुणीही तयार नाही. ऑनलाईन मतदार नोंदणी फॉर्म कसा भरतात ते देखील कुणाला माहीती नाही हे चित्र पक्षासाठी निराशादायक आहे; मात्र यापुढे सर्व कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून टाका आणि जोमाने कामाला लागला. केवळ मतदार नोंदणी हेच उद्दिष्ट न ठेवता आपल्याला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये निवडून यायचे आहे यादृष्टीने काम करा.’’

उजव्या विचारसरणीची माणसं शोधा
आगामी विधानसभेत यश मिळविणं फारसं अवघड नाही. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने उजव्या विचारसरणीची माणसं शोधा. भाजपची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोचवा. केवळ भाषणांनी निवडणूक जिंकता येत नाही. तर जास्तीत जास्त मतदार नोंदणी देखील करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बूथप्रमुखांबरोबरच स्टेजवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांनीही तातडीने कामाला लागा, असे आवाहन राज्यमंत्री चव्हाण यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘जगभरातील सर्वच माध्यमांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असा सूर लावला होता. पण केवळ पक्ष सदस्य आणि मतदार नोंदणीच्या पाठबळावर देशात भाजपची पुन्हा सत्ता आली आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्याचधर्तीवर आपणाला आगामी विधानसभेसाठी काम करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत जा, जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा.’’

मेळाव्यात अतुल काळसेकर, राजन तेली, संदेश पारकर आदींनी भाजप सरकारने राबविलेल्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवा असे आवाहन केले. भाजपचे सदस्य होण्यासाठी मतदार वाट बघताहेत. फक्‍त कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचण्याची गरज आहे. प्रत्येक बूथप्रमुख किमान १०० लोकांपर्यंत पोचला तरी सिंधुदुर्गात भाजप पक्ष संघटना मजबूत होईल. त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे, असेही आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.

विरोधक गलितगात्र
विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन नुकतेच झाले. यात विरोधी मंडळी कुठेही आक्रमक झालेली दिसून आली नाहीत. त्यांची सत्ता येणार नाही हे त्यांनाही माहिती असल्याने ते गलितगात्र झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फक्‍त प्रामाणिकपणे जरी काम केले तरी मतदारसंघात भाजपचा झेंडा निश्‍चितपणे फडकेल असेही श्री. चव्हाण म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com