esakal | खातेदारांनो तुमची प्रतिक्षा आता संपली ; एका महिन्यात मिळणार मोबदला
sakal

बोलून बातमी शोधा

Mirya-Nagpur National Highway the people who get land four-laning process start in ratnagiri

रत्नागिरी तालुक्‍यातील साठरे आणि पाली गावातील मोबदला वाटप सुरू होणार आहे.

खातेदारांनो तुमची प्रतिक्षा आता संपली ; एका महिन्यात मिळणार मोबदला

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये जमीन जाणाऱ्या खातेदारांची मोबदला मिळण्याबाबतची प्रतीक्षा तीन वर्षांनी संपली आहे. रत्नागिरी ते आंबा या सुमारे ६९ कि.मी. भागासाठी २७ गावांमधील क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यापैकी रत्नागिरी तालुक्‍यातील साठरे आणि पाली गावातील मोबदला वाटप सुरू होणार आहे. खातेदारांची खाती व इतर माहिती घेण्यासाठी महसूल विभागाने कॅम्पचे आयोजन केले आहे. डिस्टन्सिंगमुळे महिनाभर हे काम चालेल. 

हेही वाचा - सोसायट्या, बॅंकेसमोर पेच; साडेआठ हजार शेतकरी संभ्रमात! कारण....

या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ मध्ये सुरू झाली. संगमेश्‍वर तालुक्‍यातील १३ गावांमधील सुमारे १३ लाख ३६ हजार ८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्‍यातील १४ गावांमधील ६ लाख ५२ हजार चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. 
रत्नागिरील ६ आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील १० अशा, एकूण १६ गावांतील जमीन मालकांचा मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी झाली. वर्षांनंतर फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्‍यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये प्राप्त झाली. मात्र, कोरोनामुळे निधीवाटप खोळंबले. महसूलने कॅम्प आयोजित करून साठरे येथील १६, पाली बाजारपेठेतील ४९ तर पालीतील ७४ खातेदारांची बॅंक खाती व इतर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.  

हेही वाचा - जनतेचे रक्षकच संकटात, यंत्रणेपुढे मोठा पेच, जबाबदारी पेलण्याचे आव्हान

दृष्टिक्षेपात..

-असा मिळणार मोबदला..
-पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा, पानवल ६ -गावांसाठी ६९ कोटी २० लाख
-साठरे गावातील ५९ खातेदारांना ३ कोटी ५९ लाख १२ हजार
-पालीतील ७४ खातेदारांना ४ कोटी ९३ लाख ४१ हजार ७३ रुपये
-पाली बाजारपेठेतील ४९ खातेदारांना ३ कोटी ५६ लाख २ हजार

"सोशल डिस्टन्सिंग असल्याने दिवसाला ५० लोकांची माहिती घेतली जाते. ६० टक्के काम झाले असून महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोबदला वाटप होईल." 

- डॉ. विकास सूर्यवंशी, प्रांताधिकारी, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

loading image