'भंगारात काढायचे की, दुरुस्त करायचे' ? अखेर त्या जहाजाचा होणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज चार महिने व्हायला आले तरी मिऱ्याकिनारी अडकून पडले आहे.

रत्नागिरी : भरकटून मिऱ्या किनाऱ्यावर लागलेल्या बसरा स्टार जहाजाचा तळ सुमारे ६० टक्के फुटला आहे. जहाजाची दुरवस्था झाली असून दुरुस्तीला मोठा खर्च आहे. त्यामुळे जहाज भंगारात काढायचे की, दुरुस्त करायचे, हे मेरीटाइम ऑर्गनायझेशनच्या सर्व्हेअरकडून सर्व्हे केल्याचा अहवाल एजन्सीला गेल्यानंतर ठरणार आहे. पुढच्या आठवड्यात हा सर्व्हे होईल, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी दिली. 

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज चार महिने व्हायला आले तरी मिऱ्याकिनारी अडकून पडले आहे. पावसाळ्यातील अनेक हायटाईड भरतीच्या अजस्र लाटांचा तडाखा जहाजाने सोसला; मात्र आता जहाजाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. किनाऱ्याची धूप थोपविण्यासाठी दगडांचा बंधारा घातला आहे. या दगडांच्या बंधाऱ्यावर आदळून जहाजाची पुरती वाताहात झाली.

हेही वाचा - कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी हालचाली सुरु

 

जहाजाचा तळ हळूहळू करत सुमारे ६० टक्के फाटल्याचा अंदाज बंदर विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे जहाज भंगारात काढले जाणार की दुरुस्त केले जाणार, याकडे लक्ष आहे. दुरुस्तीला येणारा खर्च जास्त असला तर ते भंगारात काढण्याचा एजन्सीचा विचार आहे. त्यासाठी इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या मुंबईतील सर्व्हेअरकडून या जहाजाचा आढावा घेतला जाईल.

त्यासाठी सर्वेअर पुढच्या आठवड्यात येण्याची शक्‍यता आहे. जहाजामधील ऑइल व डिझेल काढल्याने ते आता सुरक्षित आहे; मात्र समुद्रकिनारा जहाजामुळे असुरक्षित झाला आहे. तो सुरक्षित ठेवण्यासाठी बंदर विभाग पाठपुरावा करीत आहे. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व्हेनंतर ते भंगारात काढायचे की दुरुस्त करायचे, याचा निर्णय होईल.

..तर दोन कोटी अपेक्षित

जहाजाच्या आढाव्यानंतर त्याची एकूण परिस्थिती लक्षात येईल. त्यानंतर ते दुरुस्त करायचे की भंगारात काढायचे, याचा निर्णय संबंधित एजन्सी घेणार आहे. जहाज भंगारात काढल्यास किमान २ कोटीच्या वर रक्कम एजन्सीला अपेक्षित असल्याचे समजते तर जहाज दुरुस्त करून काढल्यास त्यातून किती फायदा होणार, याचाही विचार यात होणार आहे. परंतु जहाजाच्या दुरुस्तीचे काम जास्त असल्याने कंपनी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.

हेही वाचा -  संघर्षच! रानोमाळ, दूर जंगलात शोधूनही सापडेना, कसा होणार ऑनलाईन अभ्यास?

 

दृष्टिक्षेपात..

- पुढच्या आठवड्यात होणार सर्व्हे
- ऑइल व डिझेल काढल्याने सुरक्षित
- समुद्रकिनारा मात्र, जहाजामुळे असुरक्षित 
- जहाज दुरुस्तीतून होणाऱ्या लाभाचाही विचार

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mirya port star boat 60 percent destroyed the organisation take decision boat repaired or not in ratnagiri