esakal | कोकणातील कुठल्या तीन तालुक्यात सुरू झाले मिशन "पपई लागवड' 
sakal

बोलून बातमी शोधा

0

कोकणातील वातावरणात पपई लवकर परिपक्‍व होतो. फळाला आकार आणि चव उत्तम दर्जाची आहे. पपईमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

कोकणातील कुठल्या तीन तालुक्यात सुरू झाले मिशन "पपई लागवड' 

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पपईच्या स्थानिक जातीचे संवर्धन करण्यासोबत जिल्ह्यात पपईखालील क्षेत्र वाढविण्याच्या हेतूने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व लुपिन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील पपईच्या उत्तम प्रतीच्या स्थानिक जाती आहेत. येथील हवामान पपईस पोषक आहे. कोकणातील वातावरणात पपई लवकर परिपक्‍व होतो. फळाला आकार आणि चव उत्तम दर्जाची आहे. पपईमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पपईवर कीडरोगांचा कमीतकमी प्रादुर्भाव होतो. जिल्ह्यातील वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग या तीन तालुक्‍यांमध्ये पपईच्या अनेक जाती आढळतात. त्या उत्तम दर्जाच्या जाती असूनही पपईची व्यापारी दृष्टिकोनातून लागवड झालेली नाही. जिल्ह्यात पपईची लागवड परस बागेपुरतीच राहिली आहे. त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठ आणि लुपिन फाउंडेशन यांनी जिल्ह्यातील गावानुरूप पपईचे मंडल फार्मस तयार करून शेतकऱ्यांना पपई लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने सामंजस्य करार केला आहे. तीन तालुक्‍यांतील पपईच्या जातीची निवड करून त्यातून उत्तम जातीची रोपे तयार करण्यात येणार आहे. 

स्थानिक शेतकऱ्यांनी आंबा, काजू बागांमध्ये आंतरपीक म्हणून किंवा एकपीक पद्धतीने पपईची व्यापारीदृष्ट्या लागवड केली, तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल. स्थानिक जातीमध्ये अधिक पोषणमूल्ये व औषधी गुणधर्म आहेत. जिल्ह्यात पपईचे क्षेत्र वाढल्यास ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या सामंजस्य करारानुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत संशोधनाचे काम करण्यात येणार आहे. लुपिन फाउंडेशनमार्फत वित्तीय सहाय्य व ग्रामपातळीवर पपई संशोधनाचा प्रसार करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत जिल्ह्यातील पपई पिकाखालील क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांनाच चांगले उत्पन्न मिळवून सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हा सामंजस्य करार करताना कुलगुरू डॉ. संजय सावंत, डॉ. पराग हळदणकर, डॉ. बी. एन. सावंत, लुपिन फाउंडेशन, सिंधुदुर्गचे योगेश प्रभू आदी उपस्थित होते. 


इतरही पिकांवर काम सुरू 
कृषी विद्यापीठ व लुपिन फाउंडेशन यांच्यामध्ये यापूर्वी 
सुरंगी, वटसोल, कोकम, तिरफळ, बावडिंग व स्थानिक उच्चप्रतीची जांभूळ कलम विकसित करणे आणि लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सामंजस्य करार झाले असून तयार केलेल्या रोपांची लागवड केली आहे. 

संपादन : विजय वेदपाठक