टुरिझम पोलिस ठाण्यांची गरज ः केसरकर

भूषण आरोसकर
Sunday, 29 November 2020

ते म्हणाले, ""पोलिस अधीक्षकांशी भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यातील पोलिस खात्याशी संबंधित काही प्रश्‍न गृहमंत्र्यांना पत्र देऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गोव्यात अंमली पदार्थावर कारवाई सुरू झाल्याने ते सिंधुदुर्गात येण्याची दाट शक्‍यता आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात टुरिझम पोलिस ठाणे निर्माण करावेत, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. कुडाळ आणि बांदा येथे नवीन पोलिस स्टेशन इमारती निर्माण कराव्यात, आंबोली व शिरोडामध्ये सब पोलिस स्टेशनची निर्मिती संकल्पना साकारावी, अशी मागणी आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी काल (ता.27) येथे पत्रकारांना सांगितले. 

ते म्हणाले, ""पोलिस अधीक्षकांशी भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यातील पोलिस खात्याशी संबंधित काही प्रश्‍न गृहमंत्र्यांना पत्र देऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गोव्यात अंमली पदार्थावर कारवाई सुरू झाल्याने ते सिंधुदुर्गात येण्याची दाट शक्‍यता आहे. वेगवान नौका श्रीलंकेत बांधणी करण्यात येत आहेत. त्यातील पहिली नौका महाराष्ट्रासाठी दिली जाईल. ती सिंधुदुर्गात यावी आणि मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, असे प्रयत्न आहेत. बांदा पोलिस स्टेशन किल्ल्यामध्ये आहे. तो किल्ला पर्यटनासाठी उपलब्ध करून दिला जावा आणि पोलिस स्टेशन मोकळ्या जागेमध्ये निर्माण करावे. त्यामुळे पर्यटन आणि पोलिस विभागाला उत्पन्न मिळेल.'' 

ते म्हणाले, ""सावंतवाडी संस्थान काळापासून जिल्हा कारागृह सुरू आहे. ओरोस येथे जिल्हा कारागृह सुरू झाले आहे. जिल्ह्यामध्ये 200 आरोपी क्षमतेचे कारागृह झाले आहे; मात्र सध्या 57 कैदी आहेत. तेलंगणा राज्यामध्ये जेल टुरिझम साकारले आहे. त्या धर्तीवर येथील जेलमध्ये जेल टुरिझम करावे, अशी संकल्पना आहे. कुडाळ आणि बांदा नवीन पोलिस ठाणे इमारती तर आंबोली व शिरोडामध्ये सब पोलिस ठाण्याची निर्मिती व्हावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात टुरिझम पोलिस निर्माण व्हावे, अशी मागणी आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चमध्ये 43 लाख रुपये दिले होते. त्यातून माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद, नगरपरिषदेला मास्क, सॅनीटायझर वाटप केले. जिल्हा परिषदेने अभिनंदनाचा ठराव देखील घेतला. आता आणखी 25 लाख रुपये देणार आहे. कोविडसाठी निधी दिला नसल्याची विरोधक जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. जिल्हा नियोजन मंडळातून निधी वाटप केला जातो; मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांचे पत्र दाखवून विरोधक दिशाभूल करत आहेत. आता यापुढील काळात आणखीन 25 लाख रुपये कोविडसाठी देणार आहे. त्यातून कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मोबाईल प्रयोगशाळा, ग्रामपंचायतींना मास्क, शाळांसाठी ऑक्‍सिजन ऑक्‍सिमीटर देण्यासाठी निधी देणार आहे. कोविड काळातही अनेकांना आर्थिक मदत, धान्य वाटप केले आहे.'' 

राणेंना उद्योगच नाही 
केसरकर पुढे म्हणाले, की ""राणेंना काहीच उद्योग नसल्यामुळे घाणेरड्या टीका करण्यासाठी त्यांना भाजपने पक्षात घेतले आहे. भाजप हा सज्जनांचा पक्ष आहे. राणे जेथे जातील तेथे सत्ता जाते हे माहीत असूनही भाजप अजून गप्प कसा? राज्यातील शेतकऱ्यांना फडणवीस सरकार असताना कर्जमाफीसाठी दोन वर्षे लागली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन महिन्यांत कर्जमाफीचा लाभ दिला. 

उगीच तोंडसुख नको 
केसरकर म्हणाले, की ठाकरे यांची "माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने सहा महिने मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांनी उगीच तोंडसुख घेऊ नये. राणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. उद्या कारवाई झाली तर मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यामुळेच कारवाई केली असे ओरडायला बरे.''  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla dipak kesarkar says Need for Tourism Police Stations in sindhudurg district