कृषी अभ्यासक्रमात बारावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

सिंधुदुर्गनगरी - बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्गनगरी - बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला आहे. त्यावर अपर मुख्य सचिव डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. 

राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) 23 ऑगस्टला निकाल लागला; मात्र कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.

राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 26 आॅगस्ट 2019 च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचधर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा.

या संदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असे डावखरे यांनी नमूद केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Niranjan Davkhare demand