छोटा राणेच केसरकरांना भारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

केंद्रातील भाजपच्या सत्तेने या पालिकेत कायापालट करतानाच या विजयाचे गिफ्ट म्हणून खासदार नारायण राणे यांनी पहिला निधी भेट स्वरूपात द्यावा, असा आशावाद आहे असे मत राजन तेली यांनी व्यक्त केले. 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडीकर जनतेने विजयाच्या रुपाने दाखवलेला विश्‍वास सार्थकी लावताना यापुढचा प्रत्येक दिवस येथील जनतेला दिलेला शब्द व येथील समस्या मार्गी लावण्यासाठी खर्ची घालीन. या विजयाने दहशत हा मुद्दा आता संपुष्टात येतानाच छोटा राणेच केसरकरांना भारी पडल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. 

येथील नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली, पक्ष निरीक्षक सुदन बांदिवडेकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, परीमल नाईक, उदय नाईक, समृद्धी वेलणकर, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते. 

परब विजयातून संदेश विकासाचा 

नितेश राणे म्हणाले, ""येथील जनतेने भाजपचा उमेदवार संजू परब यांना विजयी करून एक संदेश दिला आहे. हा संदेश विकासाचा असून तो आमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येणाऱ्या 1 मे रोजी दिलेल्या शब्दाप्रमाणे सावंतवाडीकर हक्काच्या कंटेनर थिएटरमध्ये बसून पहिला सिनेमा पाहतील. नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, पक्षनिरीक्षक सुदन बांदिवडेकर याचबरोबर तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळे या निवडणुकीत मिळाले असून त्यांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले आहे.'' 

धनशक्तीचा आरोप विरोधकांकडून

श्री. राणे पुढे म्हणाले, ""संजू परब यांनी नारायण राणे यांच्यावर दाखवलेल्या त्याचे फळ त्यांना मिळाले असून माझे मोठे बंधू निलेश राणे यांना संजू परब यांच्या विजयाने नववर्षाचे एक गिफ्ट दिले आहे. त्यांना नक्कीच आवडेल, या निवडणुकीमध्ये आमच्यावर धनशक्तीचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. हा आरोप म्हणजे एक प्रकारे जनतेचा अपमान होता आणि अशा अपमानाला जनता काय उत्तर देते, हे या विषयातून दिसून आले.'' 

आता बांदा ते चांदा विकासाची घोडदाैड

राजन तेली म्हणाले, ""ही निवडणूक नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर लढवली गेली होती. कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास, निष्ठा व कामाच्या मेहनतीमुळे हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. त्यामुळे आमचे अमर, अकबर, अँथोनी हे मिशन या निवडणुकीतून साकार झाले. येणाऱ्या काळात चांदा ते बांदा नव्हे तर बांदा ते चांदा अशी विकासाची घोडदौड भाजप करेल. यासाठी विरोधाला विरोध न करता सगळ्यांना घेऊन शहराचा विकास करू. लवकरच येथील गांधी चौकात विजयी मेळावा घेऊन उद्याचा आनंदोत्सव साजरा करू.'' यावेळी संजू परब यांनी ही जनतेचे आभार मानले. 

नारायण राणे यांनी निधीचे गिफ्ट द्यावे 

केंद्रातील भाजपच्या सत्तेने या पालिकेत कायापालट करतानाच या विजयाचे गिफ्ट म्हणून खासदार नारायण राणे यांनी पहिला निधी भेट स्वरूपात द्यावा, असा आशावाद आहे असे मत राजन तेली यांनी व्यक्त केले. 

कोरगावकरांबाबत पक्ष निर्णय घेईल 

विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेला अन्नपूर्णा कोरगावकर यांनी हजेरी लावली. त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले; मात्र पक्षाने त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत पक्षाची पुढील भूमिका काय असेल, असे आमदार राणे यांना विचारले असता, पराभवानंतरही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणे हे कोरगावकरांचे स्पिरिट वाखाणण्याजोगे आहे. पक्षात मी अजूनही लहान असल्याने त्यांच्या बाबतीत पक्ष योग्य निर्णय घेईल, असे राणे यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane Comment On Deepak Kesarkar Sindhudurg Marathi News