गीतेजी, तुमचा शिवसैनिकांवर भरवसा नाय काय? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

दाभोळ - गीतेजी, तुमचा शिवसैनिकांवर भरवसा नाय काय...? असा प्रश्‍न विचारत दापोलीचे आमदार संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका केली. 

दाभोळ - गीतेजी, तुमचा शिवसैनिकांवर भरवसा नाय काय...? असा प्रश्‍न विचारत दापोलीचे आमदार संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका केली. 

दापोलीत महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गीते यांनी या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार पैशाचा पाऊस पाडणार असून या "पापाच्या व शापाच्या' पैशाच्या पावसाचा शिडकावा शिवसैनिकांच्या अंगावर होता कामा नये. ही खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे असे सांगत उपस्थितांना हात वर करून या पैशाला स्पर्श करणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली. या शपथविधी कार्यक्रमाची सर्वत्र खिल्ली उडवली जात असून कदमही त्यात सामील झाले.

कदम म्हणाले, मीही शिवसेनेमध्ये वाढलो. सरपंचपदापासून जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदापर्यंत विविध पदे भूषविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कधीही कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही, हा इतिहास आहे. ज्यांनी केवळ शिवसैनिकांच्या जिवावर पदे उपभोगली त्यांना हा इतिहास काय माहीत असणार. 

2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेतही शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी असाच शपथविधीचा कार्यक्रम घेतला होता. यावेळी त्याचीच सुरवात महिला मेळाव्यापासून झाली. शिवसैनिकांना शपथ घ्यायला लावणे हा त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास आहे व स्वाभिमानी शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाहीत. मेळाव्याला दापोली विधानसभा क्षेत्रातील सुमारे 1 हजारांहून अधिक शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या सर्वांना नेकलेस भेट देण्यात आले. आता हा नेकलेसचा खर्च स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनी कोणत्या पुण्याच्या व वरदानाच्या पैशाने केला याचा शोध गीते यांनी घ्यावा,असे ते म्हणाले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Kadam comment