प्रशासनाचा कारभार सुशेगाद, शेवटी नको ते झालच, ग्रामस्थ त्रस्त

प्रभाकर धुरी
Monday, 31 August 2020

पुलाअभावी गावकऱ्यांना गावात जाण्यासाठी आता रामेश्‍वराचा फेरा मारावा लागणार आहे. 

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - अनेक वर्षांचा लढ्याचा इतिहास असलेला मुळस हेवाळे पूल (कॉजवे) अखेर वाहून गेला. पुलावरील पाणी ओसरल्यावर ते लक्षात आले. पुलाचा जवळपास अर्धाअधिक भाग पाण्याच्या प्रवाहामुळे नाहीसा झाला. काही दिवसांपुर्वी पुलाचा कोसळलेला भाग तात्पुरता दुरुस्त केला होता; मात्र ती मलमपट्टीही कुचकामी ठरली. पुलाअभावी गावकऱ्यांना गावात जाण्यासाठी आता रामेश्‍वराचा फेरा मारावा लागणार आहे. 

तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने खरारी नदीवर मुळस हेवाळे जोडणारा कॉजवे बांधून लोकांच्या येण्या जाण्याची व्यवस्था केली होती. पूल कमी उंचीचा आहे. शिवाय पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे झुजे लोबो यांची आई, त्यांच्या म्हैशी आणि अप्पासाहेब आत्माराम देसाई आणि अप्पासाहेब दत्ताराम देसाई यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक उंचीच्या नव्या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. शासनदरबारी पत्रव्यवहार झाले. चर्चा, भेटी झाल्या. जयवंतराव देसाई, झुजे लोबो आणि स्थानिक ग्रामस्थांनी पुलासाठी चळवळ उभी केली होती. तत्कालीन आमदार शिवराम दळवी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी पुलाचे आश्‍वासन दिले. 

निधी मिळालाच नाही 
नाबार्डमधून पुलासाठी निधी मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले; मात्र त्यातील एक रुपयाही पुलासाठी मिळालेला नाही. साहजिकच त्या पुलाने पाण्याच्या वेगवान प्रवाहासमोर तग धरला नाही आणि तो अर्धाहून अधिक वाहून गेला. पुलाचे पाईप शाबूत आहेत. त्यावरील सुमारे पंचवीस - तीस मिटर लांबीचा कॉंक्रीटचा थर पाण्याबरोबर वाहून गेला. तिलारी यांत्रिकी विभाग आणि गावकऱ्यांनी वाहून गेलेल्या भागात नदीतील गोटे पसरवून दोन्ही भाग जोडून तात्पुरती वाहतूक सुरु केली आहे; मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहात ते टिकेल याची शाश्‍वती नाही.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mlus hevale pool swept away in the floodwaters