कणकवली बसस्थानकाचे आधुनिकीकरण; आंब्यांची पूर्ण क्षमतेने वाहतूक... कुणी दिली ही आश्वासने... वाचा

राजेश सरकारे
Tuesday, 25 August 2020

एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली आहे.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील एसटी बसस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण होणार आहे. येथे मोठे व्यापारी संकुल आणि इतर सुविधांची निर्मिती केली जाईल. एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी असे उपक्रम राबविण्याला प्राधान्य असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी येथे दिली. 

श्री. परब यांनी कणकवली बसस्थानकाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, ""एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली आहे. सेवा स्थगित केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्पाटप्प्याने पुन्हा सेवेत घेतले जात आहे. कणकवली बसस्थानक आणि परिसरात सात एकर जागा महामंडळाच्या ताब्यात आहे. येथे बसस्थानक, एसटी कार्यशाळा यांना धक्‍का न लावता व्यापारी संकुल आणि इतर सुविधांची निर्मिती करू. यातून एसटीला उत्पन्न मिळेल आणि नागरिकांनाही चांगल्या सेवा मिळतील. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आधुनिकीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे.'' 

ते म्हणाले, "एसटीमहामंडळ आधीच तोट्यात होते. लॉकडाउनमध्ये आणखी तोटा वाढला. त्यामुळे सध्या इंधनाची बचत करून तोटा कमी करण्याला प्राधान्य आहे. कुरिअर सेवा, पार्सल सेवा व इतर उपक्रम राबविण्यामागे तोच मुद्दा आहे.'' 

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील, विभागीय अभियंता स्थापत्य प्रकाश नेरुळकर, विभागीय कर्मचारी अधिकारी लवू गोसावी, आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, स्थानक प्रमुख नीलेश लाड, तहसीलदार आर जे पवार यांच्यासह शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संजय पडते उपस्थित होते. 

पुढील वर्षी पूर्ण क्षमतेने आंबा वाहतूक 
यंदा लॉकडाउन असताना देखील एसटीमधून मुंबई, ठाणे व इतर भागात आंबा वाहतूक झाली. पुढील वर्षी तर पूर्ण क्षमतेने राज्यात आंबा वाहतूकीचे नियोजन आहे. पार्सल सेवेलाही चांगला प्रतिसाद आहे. महामंडळतर्फे कुरिअर सेवा सुरू करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असे परब म्हणाले. 

आरोग्य यंत्रणेवर ताण आला असता 
श्री. परब म्हणाले, ""गणेशोत्सवासाठी एकाच वेळी मोठ्या संख्येने बस सोडल्या असत्या तर आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असता. त्यामुळे सर्वप्रथम आयसीएमआरकडे प्रस्ताव पाठवून क्‍वारंटाईन कालावधी 14 दिवसांवरून 10 दिवसांवर आणला. त्यानंतर मुंबईतून गावागावात बस सोडण्याचे नियोजन केले. आम्ही तीन हजार बसेस तयार ठेवल्या होत्या; पण आयसीएमआरकडून नियमावली येण्यास वेळ गेला. त्यामुळे उशिरा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय झाला.'' 

ई पासबाबत लवकरच निर्णय होणार 
ई पासबाबतचा निर्णय लवकरच शासन पातळीवर होईल. एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची नोंद आम्ही घेतो. ई पास मुळे कुठल्या भागातून नागरिक कुठे जात आहेत, याचा अंदाज येतो. आरोग्य यंत्रणेला कार्यवाही करण्यास वेळ मिळतो; पण ई पास बंद केले तर कोण कुठे जातो हेच कळणार नाही. सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे ई पासबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत, असेही श्री. परब म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modernization of Kankavli bus stand; Transport of mangoes at full capacity ... Who gave these promises ... Read on