बाळंतीण कोरोना बाधित, वडिल संशयित मग नवजात शिशूसाठी कोण आले धावून....वाचा

विनोद दळवी
Friday, 24 July 2020

प्रसंग ओळखून मदतीसाठी वेळीच धावून आलेल्या सावंत दाम्पत्याच्या कृतीचे सर्वच स्तरात कौतुक होत आहे.

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : आपल्याला आज मातृत्व लाभणार, या खुशीत असतानाच तिचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे अचानक चिंतेचे ग्रहण लागले. तिची रवानगी कोविड रुग्णालयात झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नवजात बालकाची आई कोरोनाबाधित असल्याने व़डिलही कोरोना संशयित होते. अशा परिस्थित नवजात बाळाला सांभाळणार कोण, असा यक्ष प्रश्‍न उभा राहिला. त्यांचेच नातेवाईक असलेले दाम्पत्य त्यांच्यासाठी देवासारखे धावून आले. आपल्या अकरा वर्षाच्या मुलाला नातेवाईकांकडे ठेवत त्या दाम्पत्याने त्या बाळाचे पालकत्व स्विकारले.

आपणच आई-वडील आहोत, या जबाबदारीने हे दांपत्य ही जबाबदारी पार पाडली. या बाळाला कोरोना नसल्याचे निदान झाल्यानंतर त्याला या दाम्पत्याकडे सोपविण्यात आले आहे. प्रसंग ओळखून मदतीसाठी वेळीच धावून आलेल्या सावंत दाम्पत्याच्या कृतीचे सर्वच स्तरात कौतुक होत आहे.

मालवण तालुक्‍यातील पेंडूर खरारे येथील महेश सावंत सपत्नीक ठाणे येथे व्यवसायानिमित्त राहत आहेत. महेश यांची पत्नी सौ. पूनम यांच्या नात्यातील एका गरोदर मातेची प्रसूती जवळ आली होती. ही प्रसूती 16 जुलैला होईल, असे त्यांच्या डॉक्‍टरांनी सांगितले होते; मात्र त्याच दिवशी सकाळी ही नातेवाईक महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. त्यामुळे सर्वच गर्भगळीत झाले. महिला बाधित आल्याने तिचे पती म्हणजे होणाऱ्या बाळाचे पिता कोरोना संशयित झाले होते. अशा स्थितीत जन्म घेणाऱ्या नवजात बालकांचे संगोपन कसे करायचे ? त्याची जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न यावेळी उभे राहिले. या माता-पित्याच्या एका डोळ्यात आनंदाश्रु तर दुसऱ्या डोळ्यात दुखाश्रु  त्याक्षणी होते.

आपल्याला पहिल्यांदाच बाळ होणार. आपल्याला मातृत्व लाभणार. आई-बाप होण्याची प्रतीक्षा संपणार, अशा आनंदात दाम्पत्य असताना कोरोनाबाधित अहवालामुळे यांच्यासमोर या बाळाचे पुढील काही दिवस संगोपन कोण करणार हा यक्ष प्रश्‍न होता. त्यातच कोरोना झाल्याने प्रसूतीसाठी घेणार नसल्याचे तिच्या नियमित डॉक्‍टरने सांगितले. त्यामुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. कोरोना निकषानुसार मातेला कोविड रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दाखल झाल्यानंतर रात्री तिला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. यात तिला गोंडस मुलगा झाला. मुलगा झाल्याच आनंद होताच. आई कोरोनाबाधित असल्याने त्याला आईकडे ठेवता येत नव्हते. वडीलही कोरोना संशयित असल्याने ते त्याचा सांभाळ करु शकत नव्हते. तसे केल्यास बाळाला कोरोना संक्रमणाची भिती होती.

ही माहिती महेश व पूनम सावंत या दाम्पत्याला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता या नवजात बाळाला सांभाळण्याची तयारी दर्शविली. सावंत यांना 11 वर्षाचा मुलगा आहे. कोरोनाबाधित मातेच्या उदरातून नवजात बालकाने जन्म घेतला असल्याने तो बाळ सुद्धा कोरोना संशयित असू शकते. त्यामुळे आपल्या मुलाला सावंत यांनी आपल्या बहिणीकडे पाठविले. त्या बाळाला घरी आणून आपणच आई-वडील असल्याप्रमाणे संगोपन केले. आता बाळ कोरोनाबाधित नसल्याचे निदान झाल्याने त्याला त्याच्या आजोळी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे माणसे माणुसकी विसरली आहेत. रक्ताच्या नात्याला यामुळे महत्व दिले जात नाही. अशा स्थितीत कोरोनाबाधित मातेच्या उदरातून नुकताच जन्म घेणाऱ्या बालकांचे संगोपन करण्याचे धारिष्टय सावंत दांपत्याने दाखविले. ती जबाबदारी यशस्वी निभावली. त्यामुळे या दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सावंत मदत कार्यातही पुढे
कोरोना प्रभाव सुरु झाल्यानंतर महेश सावंत यांनी आपल्याकडे असलेल्या जमा पूंजीतून गरीब नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. ते राहत असलेल्या भागात त्यांनी धान्य वाटप केले आहे. आयुर्वेदिक गोळ्यांचे सुद्धा वाटप केले आहे. याचाच अर्थ सावंत दांपत्याच्या अंगात मदतीला धावून जाण्याची वृत्ती आहे. त्यातूनच या दोघांनी हे मोठे धाडस केले.

संपादन ः विजय वेदपाठक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother corona infected, father suspected then who came running for the newborn baby