पोटच्या गोळ्यासाठी आईच काळीज धावल अन्...

mother saved her child in vaibhavwadi
mother saved her child in vaibhavwadi

वैभववाडी - नऊ महिन्याच्या बालकाला घरात घुसुन पळविण्याचा प्रयत्न काल (ता.1) रात्री साडेअकरा वाजता तालुक्‍यातील कोळपे येथे झाला. हा प्रकार करणाऱ्या छत्तीसगड येथील मगनलाल छगनलाल श्रीवास (वय 28) याला बालकाच्या आईने पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र तो संशयित पसार झाल्यामुळे आज नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी पुन्हा त्या संशयिताला शोधून आणत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्याशी हुज्जत घातली. संशयितावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठाणे अंमलदारावर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

याबाबत पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार ः कोळपे-जमातवाडी येथील रमजान अब्बास राऊत यांचे संपुर्ण कुटुंब झोपी गेले होते. श्री. राऊत यांची पत्नी अस्मा हिच्या शेजारी नऊ महिन्याचा बालक सुलतान होता. रात्री साडेअकरा वाजता अस्मा यांना जाग आली. एक अनोळखी व्यक्ती घरात घुसून आपल्या मुलाला घेवून पलायन करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केला असता घरातील सर्व जागे झाले. त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीला पकडले. त्याच्याजवळील बालकाला आपल्या ताब्यात घेतले. आरडाओरडा झाल्यामुळे आजूबाजूचे लोकही तेथे जमा झाले. संशयितास त्यांनी पकडून वैभववाडी पोलिस ठाण्यात आणले व पोलिसांच्या स्वाधीन केले. घडलेला संपूर्ण प्रकार ठाणे अंमलदारांना सांगितला. तरीदेखील ठाणे अंमलदारांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर घेत उद्या सकाळी दूरध्वनी करतो नंतर या, असे सांगितले. त्यामुळे नातेवाईक घरी गेले. 

आज सकाळी पोलिसांच्या दूरध्वनीची त्यांनी वाट पाहिली; परंतु दूरध्वनी आला नाही. त्यामुळे नातेवाईक आणि गावातील पंधरा ते वीस ग्रामस्थ पोलिस ठाण्यात आले. त्यांनी संशयित कुठे आहे, अशी विचारणा केली असता तो पसार झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे कोळपे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पोलिसांना जाब विचारण्यास सुरूवात केली. मुल पळविणे हा गंभीर गुन्हा असताना रात्रीच गुन्हा का दाखल केला नाही, पोलिसांच्या ताब्यातील संशयित पसार होतो कसा, आदी प्रश्‍नांचा एकच भडीमार केला. त्यानंतर काही ग्रामस्थ त्या संशयिताचा शोध घेण्यास गेले. 
ही माहिती समजताच भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, स्वप्नील खानविलकर, हुसेन लांजेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ पोलिस ठाण्यात आले. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी संशयितास रेल्वेफाटकाजवळ पकडले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी संशयित मगनलाल श्रीवास याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

कोळपेतील बालक पळविणे प्रकारची रविवारी रात्रीच तक्रार का घेतली नाही, याबाबतचा खुलासा त्या कर्मचाऱ्याकडे मागितला आहे. खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल. 
दत्तात्रय बाकारे, सहायक पोलिस निरीक्षक, वैभववाडी 

ठाणे अंमलदारावर कारवाईची मागणी 
बालकाला पळविणे हा गंभीर गुन्हा असताना देखील रविवारी रात्री ठाणे अंमलदाराने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर उद्या दूरध्वनी करतो असे सांगूनही संपर्क केला नाही. अशा बेफीकीर पोलिस कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कोळपेतील हुसेन लांजेकर यांनी केली. 

अजब कारभार 
वैभववाडी पोलिस ठाण्यातील अजब कारभाराचा नमुना आज सर्वांना पाहिला मिळाला. कोळपे ग्रामस्थांनी बालकाला पळविणाऱ्या संशयितास पकडून ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, तो संशयित पळून जाणार नाही, याची दक्षता घेणे ही जबाबदारी पोलिसांची होती. प्रत्यक्षात पोलिसांच्या ताब्यातील संशयित पसार झाला. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे धिंडवडे निव्वळ एका कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळे निघाले आहेत. 

रॅकेटची शक्‍यता 
बालकाला पळविताना एकाला पकडले असले तरी त्याचा दुसरा साथीदार दुचाकी घेवून रस्त्यावर उभा होता, असे पकडलेल्या संशयितांकडून सांगण्यात आले. याशिवाय संशयिताने आपल्या मोबाईलवरून गोव्यातील एका महिलेशी संभाषण केले. त्यामुळे मुले पळविणारे रॅकेट कार्यरत असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com