
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - निसर्गरम्य सुंदरवाडीचा संस्थान काळापासून मानबिंदू असलेला मोती तलाव निसर्गाची एक अनोखी देणगी आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही त्याचे मोठे महत्त्व आहे; मात्र या मोती तलावात बोटिंग, नौकाविहारसारखे प्रकल्प जास्त काळापर्यंत तग धरू शकले नाहीत. अलीकडेच दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पही मेरिटाईम बोर्डाने गुंडाळायला लावला होता. पर्यटन वाढीसह, पालिकेच्या उत्पन्नात भर टाकणाऱ्या या प्रकल्पांशी पुन्हा निसर्गरम्य मोती तलावाची नाळ जोडली जाणार का? हे अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.
शहराच्या अगदी मधोमध निसर्गाची देणगी असलेला हा मोती तलाव आहे. मोती तलावात कोणतेही बोटिंग, नौकाविहारसारखे पर्यटनाला पुरक क्रीडा प्रकार कायमस्वरूपी होऊ शकले नाहीत. दीपक केसरकर, श्वेता शिरोडकर आणि बबन साळगावकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात अल्पकाळासाठी बोटिंगसारखे प्रकल्प सुरू राहिले होते; मात्र ते सातत्य ठेवू शकले नाहीत.
शहराचे वैभव म्हणून मोती तलावाकडे पाहिले जाते. तलावात पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणारा कारंजा सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असायचा; मात्र हा कारंजा आता नसला तरी सायंकाळच्या वेळी मोती तलावाच्या काठावर बसण्याचा आनंद मात्र स्थानिकांसह या भागातून जाणारे अनेक पर्यटक घेतात. राज्यातील अनेक तलावामध्ये बोटिंग, नौका विहारसारखे प्रकल्प तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्यामुळे याचा फायदा पर्यटनवृद्ध, उत्पन्नात वाढ होण्यासाठी होतो; मात्र या बाबतीत मोती तलाव मात्र तसा दुर्लक्षितच राहिला.
येथील शहराच्या बाहेरून मुंबई-गोवा महामार्ग व रेल्वे मार्ग गेल्याने आधीच शहरातील व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शहरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसे विविध प्रकल्पही आखण्यात आले; मात्र राजकीय अनास्थेमुळे ते अद्यापही अर्धवट स्थितीतच राहिले. श्री. केसरकर नगराध्यक्ष असताना काही बोटी खरेदी करून तलावात बोटिंग प्रकल्पासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र हा प्रकल्प जास्त काळ टिकू शकला नाही.
बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना 2011-13 दरम्यान बोटिंगसाठी प्रयत्न करण्यात आले. जुन्या झालेल्या या बोटी अद्यापही जैसे थेच आहेत. पावसाळी कालावधीचे पाच ते सहा महिने सोडले तर सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बोटिंगसाठी वापरात येऊ शकतो. शहरात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नौकाविहार तसेच स्कुबा डायविंगसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; मात्र प्रकल्प चालवण्यासाठी कोणीही वॉटर स्पोर्ट कंपनी मोठ्या कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी टिकाव धरू शकली नाही.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष साळगावकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या मासिक सभेत ठराव घेऊन शिरोडा येथील राज स्कुबा डायविंगच्या माध्यमातून बोटिंग प्रकल्प सुरू केला होता; मात्र काही तासांतच मेरीटाइम बोर्डाने हस्तक्षेप करीत पालिकेत नौकाविहार वॉटर स्पोर्ट स्कुबा डायविंग करणे मोती तलावाचे क्षेत्रफळ पाहता धोकादायक असल्याचे कारण देत हा प्रकल्प बंद करायला भाग पाडले होते. शहरात पर्यटन वाढीसाठी अनेक इतर प्रकल्प प्रस्तावित आहेत. काही प्रकल्पांची आश्वासने देण्यात आली आहेत.
या प्रकल्पांसाठी आवश्यक तो निधी मंजुरी, ना हरकत असल्यावरच प्रकल्प होऊ शकतात. असे अनेक प्रकल्प शहरात रखडले आहेत जे पर्यटनाच्यादृष्टीने प्रस्तावित होते. योग्य ती आवश्यक परवानगी घेऊन निधी मिळवून पालिकेच्या पुढाकारातून नौकाविहार, बोटिंगसारखे प्रकल्प साकारू शकतात. येथील शहराला भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी सायंकाळच्या वेळी तलावात होणारी बोटिंग नौकाविहार हा आकर्षणाचा विषय ठरू शकतो; मात्र त्यादृष्टीने पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सकारात्मक निर्णय घेऊन प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सावंतवाडी येथील मोती तलावात प्रायोगिक तत्वावर बोटींग व्यवसाय माझ्या कारकिर्दीत सुरू करण्यात आला होता; मात्र थांबविण्यात आला. पर्यटन वाढीच्या दृष्टीने तसेच बोटिंग सेवा उपलब्ध केल्यास पर्यटकांना लाभ घेता येईल.
- बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी.
शहर विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. बोटिंग व्यवसायाचा फायदा पर्यटन वाढीसाठी व कर उत्पन्नात वाढवण्यासाठी होऊ शकतो. भविष्यात निधीची उपलब्धता झाल्यास पालिकेच्या माध्यमातून या गोष्टींसाठी प्रयत्न करण्यात येईल.
- संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.