Loksabha 2019 : स्वाभीमान पक्ष तूर्तास दोन जागा लढवणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

 ‘‘लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग- रत्नागिरी येथे नीलेश राणे व औरंगाबादमध्ये अशा दोन जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढविणार आहे. अन्य जागा लढविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. चार तारखेनंतर याबाबत योग्य ती माहिती जाहीर करू.’’

सावंतवाडी - ‘‘लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग- रत्नागिरी येथे नीलेश राणे व औरंगाबादमध्ये अशा दोन जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढविणार आहे. अन्य जागा लढविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. चार तारखेनंतर याबाबत योग्य ती माहिती जाहीर करू.’’ अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली.

तालुकाध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळल्याच्या प्रकारानंतर त्यांची भेट घेण्यासाठी श्री. राणे येथे आले होते. श्री. राणे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गात दहशतवाद नाही. काही राजकारणी केवळ आपल्या फायद्यासाठी त्या ठिकाणी जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र अशा प्रकारचे कोणतेही प्रकार जिल्ह्यात घडत नाहीत.’’

‘मी सीनियर राजकारणी आहे, संजू परब यांच्या गाडी जळीत प्रकरणात कोणावर आरोप करणार नाही आणि कोणाला सोडणारही नाही. संजू परब यांची गाडी जाळणाऱ्या संशयिताचा शोध पोलिस नक्कीच घेतील, याचा मला विश्वास आहे,’ असा दावाही श्री. राणे यांनी येथे केला. 

माजी खासदार नीलेश राणे यांना सहकार्य करण्यासाठी सगळ्या पक्षांचे लोक तयार आहेत. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. शिवसेनेचे लोकसुद्धा आम्हाला नक्कीच मदत करतील, असा विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला. 
 
राणे म्हणाले, ‘‘गाडी जाळल्याच्या प्रकाराबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशय व्यक्त केल्यानुसार संबंधितांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकारामागे नेमका कोण आहे, याचा शोध सावंतवाडी पोलिस नक्कीच घेतील. मी पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संशयिताला पकडू, असा शब्द दिला आहे. त्यामुळे माझा पोलिसांवर विश्वास आहे.’’

ते म्हणाले, ‘‘गाड्या जाळणे, हे मर्दाचे काम नाही. असा प्रकार करून कोण संजू परब यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही पक्ष म्हणून कायम राहू; परंतु या प्रकारामागे हा आहे, तो आहे असे सांगून आरोप करणार नाही. मी सीनियर राजकारणी आहे. त्यामुळे नुसते आरोप करणार नाही; पण या प्रकरणामागे कोण मिळाला तर त्याला सोडणारसुद्धा नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment