महाराष्ट्रातील सरकारवर खासदार नारायण राणेंची 'ही' टीका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

तीन पक्षात एकमत नसल्याने विकास होऊ शकत नाही. त्यामुळे हे सरकार काही महिन्यातच कोसळेल. भाजप शिवसेना महायुती की निवडणूक पूर्वी एकवाक्‍यता होती. सगळे ठरलेले होते; मात्र शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला केले. जे गुन्हे मागे घेतले जात आहेत ते शक्‍य नाही. प्रत्येक गुन्हा न्यायालयात जातो.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - राज्यातील विकास कामांना स्थगिती देऊन कामे बंद करून ठेकेदारांना बोलवून घेणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. म्हणूनच राज्यात स्थापन झालेले हे सरकार विकास व प्रगतीसाठी नसून केवळ विकास कामांना स्थगिती देण्यासाठी आले आहे. म्हणूनच हे स्थगिती सरकार आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

येथील ओम निवासस्थानी राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार भाजपचे आमदार नितेश राणे आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ""राज्यात 28 नोव्हेंबरला आलेल्या सरकारने गेल्या दहा दिवसात खाते वाटप काही केला नाही. तीन पक्षाचे मिळून तयार झालेले हे स्थगीती सरकार आहे. राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी उद्योगासाठी हे सरकार एकत्र आले नसून वैयक्तिक स्वार्थासाठी हे सरकार एकत्र आलेले आहे. या सरकार विरोधात आम्ही जनतेपर्यंत जाणार असून येत्या 15 ते 18 डिसेंबरच्या कालावधी भाजपचे सगळे लोकप्रतिनिधी गावागावात जाऊन भाजपचे सरकार का आले नाही याची माहिती जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. या सरकार व सत्ताधारी पक्षातील आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार आपल्या या संपर्कात आहेत. लवकरच काहीतरी घडेल.''

एकमत नसल्याने सरकार कोसळणार

ते म्हणाले, ""तीन पक्षात एकमत नसल्याने विकास होऊ शकत नाही. त्यामुळे हे सरकार काही महिन्यातच कोसळेल. भाजप शिवसेना महायुती की निवडणूक पूर्वी एकवाक्‍यता होती. सगळे ठरलेले होते; मात्र शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला केले. जे गुन्हे मागे घेतले जात आहेत ते शक्‍य नाही. प्रत्येक गुन्हा न्यायालयात जातो. जेवढे गुन्हे मागे घेतले आहे ते घेता येत नाही. ते फक्त प्रसिद्धीसाठी आहे.''

शिवसेनेच्या खासदारांचे नियमबाह्य आदेश

शिवसेनेचे खासदार सरकारी अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत ते नियमबाह्य आहे. केंद्रात शिवसेना सत्तेत नाही. त्यामुळे खासदारांना असे आदेश देता येत नाहीत. जनतेची ते फसवणूक करीत आहेत. आढावा बैठका घेण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला. चिपी विमानतळ एप्रिलमध्ये सुरू होणार अशी घोषणा करण्याचा त्यांना अधिकार नाही. हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

विकास कामे ठप्प 

जिल्ह्यातील विकास कामे सध्या ठप्प आहेत. मुळात सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये विकास प्रक्रियेची प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणे गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार अस्तित्वात असून नसल्यासारखे असल्याने जिल्ह्याच्या विकासावरही त्याचा परिणाम होत आहे.

जिल्हा बॅंक स्वबळावर लढवणार 

जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका यापुढे भाजप स्वबळावरच लढवणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही स्वबळावर लढवली जाईल. याच बरोबर सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होतील असा दावाही राणे यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane Criticism On Maharashtra Goverment