माझ्या जीविताला धोका आहे, कमी जास्त झाल्यास राज्य सरकार जबाबदार; नारायण राणे

राजेंद्र कळंबट्टे
Sunday, 10 January 2021

राज्य सरकारने भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरुन भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. 

रत्नागिरी :  माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. ती सरकारने आता काढली, याबाबत माझी काहीही तक्रार नाही; परंतु माझ्या जीवाचे कमी जास्त झाल्यास जबाबदार राज्य सरकार असेल, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला केंद्राची सुरक्षा पुरवत माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राने घेतल्याचे आवर्जुन सांगितले.

राज्य सरकारने भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरुन भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. रत्नागिरी दौर्‍यावर असलेले भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, माझी सुरक्षा कालच काढून घेण्यात आली आहे. मी त्याचा जास्त विचार करत नाही. सरकारकडून सातत्याने सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. झेड प्लस वरून इथपर्यंत सुरक्षा आणली. पण मी काहीच बोललेलो नाही. माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा पुरवली होती. ती या सरकारने काढून घेतली. मला याबाबत काहीही तक्रार करावयची नाही. माझ्या जीवाचे कमी जास्त झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. राज्याकडून सुरक्षा कपात करण्यात आली असली तरी केंद्राकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा पुरवली आहे. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राने घेतली आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या प्रकरणाची कसुन चौकशी करण्याची गरज असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केले. या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहीजे. राज्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. भंडारा येथील घटना भयनाक आहे. राज्यात स्त्रियांवरील अत्याचार, दरोडे यामध्ये वाढ झाली आहे. यावर राज्य सरकार नियंत्रण ठेवण्यात अपयशी झाले असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळाबाबत ते म्हणाले की दोन्ही विमानतळे रखडण्याला शिवसेना जबाबदार आहे. येथील कामे पूर्ण करण्यात या सरकारमध्ये दम नाही. सिंधुदुर्ग विमानतळासाठी विज, पाणी आणि रस्ता या सुविधा पूर्ण करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारला निधी द्यावा लागणार आहे. शिवसेनेमुळे सहा वर्षे विमानतळ होऊ शकले नाही.

हेही वाचा- मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय शिवसेना घेणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुर्ची वजनदार वाटते. तसेच यावरुन काँग्रेसही बाजूला होईल असे वाटत नाही. काँग्रेसचे तत्त्व सर्व धर्म सम भाव आहे; परंतु सत्तेसाठी हिदूत्त्व असलेल्या शिवसेनेशी आघाडी केली. पदासाठी आणि पैशासाठी ते काहीही करु शकतील, असे सांगतानाच शिवसेनेने कोकणच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप केला. शिवसेना असेपर्यंत रत्नागिरीचा विकास होणार नाही, असा टोला हाणला.
 

संपादन - अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane worn for government Mumbai Police provide security government removed