मालवणाचा विकास आता कोटीत ः खासदार राऊत

प्रशांत हिंदळेकर
Monday, 30 November 2020

आमदार नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. 

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात सुमारे पाच कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहराचा विकास आता लाखात नव्हे तर कोटीत होईल, असे सांगत शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. आमदार नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. 

यावेळी संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, जोगी, कॉंग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण यांनी केले. 

श्री. केसरकर म्हणाले, ""जिल्ह्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याने एक ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने ती अपूर्ण राहत आहेत. हे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे. ठेकेदारांना पालकमंत्री वठणीवर आणतील.'' श्री. नाईक म्हणाले, ""येथील रस्त्यांबाबत जनतेची नाराजी आपण जाणून आहोत. या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मालवण विकसित व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून फिश अक्वेरियम, नळपाणी योजना, सुसज्ज जेटी, बसस्थानक व सिनेमागृह विविध कामे येत्या काळात पूर्ण होतील.'' यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सर्व कामांची माहिती देत आपण पाहिलेले म्युझिकल फाउंटनचे स्वप्न आज पूर्ण झाले असे सांगत सर्वांचे आभार मानले. 

या कामांना सुरुवात 
अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून येथील पालिकेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम या प्रकल्पासाठी 2 कोटी एक लाख 4 हजार निधी मंजूर. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेतून 1 कोटी 81 लाख 37 हजार निधीतून सोमवारपेठ येथे भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे. वैशिष्टपूर्ण योजनेतून 1 कोटी 25 लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ पालिकेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी. या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. 

सुदेश आचरेकरांना खुली ऑफर 
पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात सुदेश आचरेकर यांचे नाव घेत शाब्दिक टोलेबाजी केली. पालकमंत्री सामंत म्हणाले, ""आमदार नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मालवणात आणण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मालवणचे वैभव आणखी वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आता विचार करावा.'' यावर आचरेकर यांनी हात जोडले. पालकमंत्री यांनी, नुसते हात जोडू नका, तर यावर विचार करा. आपल्या भाषणाचा समारोप करतानाही पालकमंत्र्यांनी पुन्हा आचरेकर यांना सूचित करत विचार करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी आचरेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सर्वांसमक्ष दिली. 
 

- संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Raut said, development of Malwana is now crore