माझ्यावर जी कारवाई करायची असेल ती करावी ; खासदार सुनिल तटकरे

चेंद्रशेखर जोशी 
Saturday, 24 October 2020

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे या सरकारचे घटक पक्ष असतानाही हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दाभोळ  : दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात विधानसभेचे सभापती नाना पटोले यांचेकडे 20 ऑक्टोबर रोजी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. एका आमदाराने खासदारांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
  

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे या सरकारचे घटक पक्ष असतानाही हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या प्रस्तावानंतर खासदार सुनिल तटकरे यांनी या विषय़ावर आपली भुमिका मांडली आहे. आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता ते म्हणाले की, त्यानी हक्कभंग दाखल केलेला आहे, आपण जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच वेळा आमदार व आता संसद सदस्य अशा वेगवेगळ्या भूमिकेत आपण काम करत असताना या पद्धतीचा हक्कभंग त्यांनी दाखल केला आहे. माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमजाचा संदेश जाता कामा नये. त्यामुळे मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले याना विनंती करणार आहे की त्यानी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये मला संसद सदस्य म्हणून बैठक बोलावण्याचा अधीकार आहे की नाही ते त्यांनी तपासून पहावे, तातडीने त्यांनी मला नोटीस काढावी, मी त्याला उत्तर देणार नाही. 

मी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, आणि म्हणूनच हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेऊन माझ्यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी, पाच वर्षे महाराष्ट्रात भक्कमपणे सरकार टिकवायचे आहे, त्यामुळे हे महान देशभक्त दुर्देवाने त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत आहेत. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असेही खा. सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. 
काही महीन्यांपूर्वी आपण मंडणगड येथे गेलो असताना तेथे शिवसेनेचे काही स्थानिक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पण आपण त्याला कडाडून विरोध केला होता. पण नंतरच्या कालावधीत मात्र आमचे दापोली पंचायत समितीचे सभापती राऊफ हजवानी यांच्या पत्नीला शिवसेनेत प्रवेश देत त्यांनी आघाडीच्या धर्माला तिलांजली देण्याचे काम केले असेही तटकरे यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sunil Tatkare comment on Proposal of infringement