रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीवर `यांचाच` वरचष्मा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

चेतन दळवी यांनी त्यांच्या निवडीनंतर अवघ्या चोवीस तासात पदाचा राजीनामा दिला. पक्षातील अंतर्गत विरोधामुळे दळवी यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.  दळवी यांचे मूळ गाव राजापूर येथील आहे. परंतु ते सध्या ठाणे येथे पक्षांमध्ये सक्रिय आहेत.

चिपळूण ( रत्नागिरी ) - रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन दळवी यांची नियुक्ती करताना तटकरे यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी पक्षातंर्गत दबाव सुरू झाला आणि दळवी यांना 24 तासातच राजीनामा द्यावा लागला. यावरुन तटकरे यांचे जिल्ह्यात वजन असल्याचे दिसून आले. हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. 

चेतन दळवी यांनी त्यांच्या निवडीनंतर अवघ्या चोवीस तासात पदाचा राजीनामा दिला. पक्षातील अंतर्गत विरोधामुळे दळवी यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.  दळवी यांचे मूळ गाव राजापूर येथील आहे. परंतु ते सध्या ठाणे येथे पक्षांमध्ये सक्रिय आहेत. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सक्रिय व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे जिल्हाध्यक्ष पदाची मागणी केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे दळवी हे मोठे समर्थक आहेत. त्यामुळे दळवी यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यात आव्हाड यांनी मोठी भूमिका निभावली होती.

पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राकेश चाळके यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करून जिल्हाध्यक्षपदाची जागा रिकामी केली. तेथे दळवी यांची नियुक्ती झाली. सावर्डे येथे झालेल्या पक्षाच्या अभिप्राय सभेत दळवी यांना नियुक्तीचे पत्र दिले; मात्र दळवी यांच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत कुरबूर सुरू झाली. जिल्ह्यात पक्षाचे अनेक युवक या पदासाठी लायक असताना त्यांना डावलून बाहेरचा कार्यकर्ता का दिला? अशी विचारणा सुरू झाली होती. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. आम्हाला स्थानिक कोणीही चालेल. जिल्ह्याबाहेरचा पदाधिकारी दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी आपल्या व्यथा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्या होत्या. 
- गौरव पाटेकर, उपाध्यक्ष, 
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, रत्नागिरी जिल्हा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sunil Tatkare Supremacy In Ratnagiri DIstirct NCP