बातमीचा परिणाम - कोकणातील तिवरे धरणावर होणार आरसीसी भिंत ; विनायक राऊत

MP Vinayak Raut Decision for kokan tivare dam but Citizens demand that Tiwari dam should be made of concrete instead of soil
MP Vinayak Raut Decision for kokan tivare dam but Citizens demand that Tiwari dam should be made of concrete instead of soil

चिपळूण (रत्नागिरी) : तिवरे धरण फुटलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत बांधण्यात येणार असून त्याचा आऊटलेटही आरसीसीचा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. तिवरे धरण मातीऐवजी कॉंक्रिटचे व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. 


गतवर्षी झालेल्या तिवरे धरण दुर्घटनेत मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाली. दुर्घटनेनंतर दौऱ्यावर आलेल्या मंत्री, नेतेमंडळीनी मोठमोठी आश्वासने दिली. गुरुवारी या धरणफुटीला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या वर्षभरात पुनर्वसन, पाणी, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. एकूणच राजकीय अनास्था या वर्षभरात दिसून आली. या संदर्भात वर्षभरातील घडामोडींचा आणि एकूणच अनास्थेवर "सकाळ'ने प्रकाशझोत टाकल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वर्षभरातील रखडलेले सारे प्रश्न, पुढील वाटचाल याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता, त्यांनी कोरोना लॉकडाउनचे कारण दिले. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात पुढील कामाला नक्कीच गती दिली जाईल, असा आशावाद व्यक्त केला. 


खासदार राऊत म्हणाले की, धरणग्रस्त पुनर्वसन वसाहत कामाला नोव्हेंबरपासून प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने एकूण 11 कोटी देण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर धरण पुनर्बांधणी, मंजूर झालेला पूल, साकव, रस्त्यांची कामेही पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. एकूण 56 जणांना घरे दिली जाणार आहेत. गावात जागा उपलब्ध झाल्यास तेथे 14 जणांना, अन्यथा अलोरे येथेच सर्वांना घरे दिली जाणार आहेत. घरांच्या दोन निविदा काढल्या आहेत. उर्वरित निविदा या आठवडाभरात निघतील. ऑक्‍टोबरपर्यंत मॉडेल घर तयार करून नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात घरांच्या कामाना सुरवात केली जाईल. 

 
पाण्याचा प्रश्नही सुटणार 
धरणाच्या पुनर्बांधणीचे कामही याच हंगामात हाती घेतले जाईल. सध्याच्या धरण फुटलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत बांधण्यात येणार असून त्याचा आऊटलेटही आरसीसी केला जाणार आहे. आता नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ती कामे आरसीसी केली जाणार आहेत. पाणीयोजनेची विहीर बांधून झालेली आहे; मात्र तिचे खोलीकरण करण्याची मागणी झाल्याने वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. याचबरोबर रस्ते, पूल, साकवांची मंजूर कामेही पावसाळ्यानंतर गती घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

"सकाळ'चा पाठपुरावा 
तिवरे धरणफुटीला 2 जुलैला वर्ष पूर्ण झाले. "सकाळ'ने तेथील परिस्थिती आणि आवश्‍यक बाबींचा आढावा घेतला.याची दखल घेत खासदार राऊत यांनी संरक्षण भिंत बांधण्याची घोषणा केली. "सकाळ'ने तिवरे धरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सातत्याने मांडून आवाज उठवून पाठपुरावा केला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com