esakal | मुंबई- गोवा महामार्गावर बांद्यातील चौकात होणार उड्डाणपूल
sakal

बोलून बातमी शोधा

o

बांद्यातील या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी याबाबत वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी उपोषण करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

मुंबई- गोवा महामार्गावर बांद्यातील चौकात होणार उड्डाणपूल

sakal_logo
By
नीलेश मोरजकर

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : शहरातून गेलेल्या झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर बांदा बसस्थानक ते स्मशानभूमी टप्प्यात 500 मीटर लांब उड्डाणपुलाला राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजुरी दिली आहे. याचे रेखाचित्र व अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी पाठवावे, असे राष्ट्रीय महामार्ग कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता (कोकण भवन, नवी मुंबई) यांनी रत्नागिरीतील कार्यकारी अभियंत्यांना कळविले आहे. याबाबत वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. 


महामार्गात बांदा शहर येते. या चौकात गोवा, दोडामार्ग, सावंतवाडी, आंबोली व शहरात प्रवेश करण्यासाठी दोन, असे सहा रस्ते एकत्रित येतात. नियोजित आराखड्यात उड्डाणपूल नसल्याने महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. वाढणारे शहरीकरण, वाहनांची वाढणारी संख्या यामुळे अपघात टाळण्यासाठी आईर यांनी 26 जानेवारी 2018 ला चौकात उपोषण केले होते. त्यानंतर सातत्याने आईर यांनी उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला. बांदा, वाफोली, भालावल, इन्सुली, डेगवे आदींसह 28 ग्रामपंचायतींच्या उड्डाणपुलासाठीचा ठराव देण्यात आला होता. 

सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उड्डाणपुलासाठी 80 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे उपविभागीय कार्यालयास कळविले होते. मंजुरीसाठी आईर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्राने नव्याने मंजुरी दिलेल्या संकेश्‍वर-बांदा प्रस्तावित महामार्ग शहरातील कट्टा कॉर्नर चौकातच येणार असल्याने उड्डाणपूल अत्यावश्‍यक आहे. हा नवा महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला छेदणार असल्याने याठिकाणी वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. 

उड्डाणपूल झाल्यानंतर येथील अपघातांची संख्या कमी होणार आहे. उड्डाणपुलामुळे कट्टा कॉर्नर चौकातील अंतर्गत वाहतुकीला अपघाताची भीती राहणार नाही. रेखाचित्र व अंदाजपत्रक यासाठी श्री. आईर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. 


कट्टा कॉर्नर चौक अपघात प्रवण क्षेत्र 
जिल्हा वाहतूक शाखेने महामार्गावरील जिल्ह्यातील अपघात स्थळांचे पुण्यातील एका खासगी एजन्सीद्वारे 2019 मध्ये सर्वेक्षण केले होते. संस्थेच्या प्रमुख कोकिळा मेहता यांनी बांदा बसस्थानक ते स्मशानभूमी भाग अपघात प्रवण आणि अतिशय धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिला होता. अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल व्हावे, असेही त्यांनी अहवालात नमूद केले होते. 

या चौकात कित्येकांचा बळी गेला आहे. त्यामुळे उड्डाणपुलासाठी प्रयत्नशील होतो. मला 28 ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळाल्याने लढ्याला यश आले. उड्डाणपुलामुळे अपघात कमी होतील. वाहतूक विनाअडथळा होईल. उभारणीसाठीही पाठपुरावा करू.
- संजय आईर, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन : विजय वेदपाठक