अखेर २१ तासांनी मुंबई- गोवा महामार्ग सुरू; दरड हटविण्यात यश 

सिध्देश परशेट्ये
शुक्रवार, 10 जुलै 2020

वाहतूक आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरु झाली आहे. 

खेड - मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धामणदेवी येथे मुंबई- गोवा महामार्गावर कशेडी घाटात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दरड कोसळून महामार्ग २१ तास ठप्प झाला होता. ही वाहतूक आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरु झाली आहे. 

काल (ता. ९) जुलै रोजी रात्री आठ वाजता रस्त्या कडेच्या डोंगराचा भाग खचून भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती कशेडी महामार्ग पोलिसांना  समजताच त्यांनी पोलादपूर प्रशासन व महामार्ग प्रशासन तसेच एल अँड टी कंपनी यांना माहिती  दिली. यावेळी तातडीने पोलादपूरचे नायब तहसीलदार समीर देसाई, पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तर हायवेचे विक्रम गुंजाळ धायगुडे आणि खेड हद्दीतील कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह सर्व पोलिस टीम घटनास्थळी दाखल झाली होती. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने हालचाली करून  महामार्ग प्रशासन व एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  जेसीबी व पोकलेनच्या साह्याने रात्री उशिरा ९ नंतर दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली होती. 

दरड हटविण्याचे काम गुरुवारी रात्रभर सुरु  होते. मात्र, मातीचा मोठा ढिगारा खाली आल्याने  आज शुक्रवारी सायंकाळी दरड बाजूला करून महामार्ग एकेरी वाहतुकीला मोकळा  करण्यात आला आहे.

दरडीची टांगती तलवार कायम 

दरडप्रवण क्षेत्रामध्ये दरडीची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसून आले. काल रात्री कोसळलेली दरड २१ तासांनी दूर करण्यात आली तरी दरड कोसळलेल्या डोंगरातील मोठमोठे सैल झालेले दगड आणि मातीचे ढिगारे कोणत्याही क्षणी संततधार पावसामुळे पुन्हा कोसळू शकतील अशी दाट शक्यता आहे.

दरड पुन्हा खाली आली 
संपूर्ण रात्रभर युध्दपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू असताना सकाळी तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडून नायब तहसीलदार समीर देसाई यांनी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दरड हटवून घाटर स्ता सुरू होईल अशी माहिती दिली होती. मात्र साधारणपणे सकाळी साडेनऊ वाजता पावसाचा जोर वाढला आणि पुन्हा त्याच ठिकाणी डोंगरातील कातळालगतचा मातीचा भराव कोसळल्याने हे दरड हटविण्याचे काम अधिक वाढले.

हे पण वाचा - सुखद! कुडाळ - पावशीचे ऋणानुबंध पुन्हा दृढ, काय आहे कारण? 

 ढाबे, हाँटेल बंद असल्यामुळे वाहन चालकांचे हाल 

दरड हटविण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे पोलादपूर येथे वाहतूक पोलिसांनी कशेडी घाटातून कोकणात जाणाऱ्या वाहनांना रोखून धरल्यामुळे तब्बल दहा किमी अंतरापर्यंत ट्रक, टँकर्स, कार, टेम्पो आणि मालवाहू गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहनांतील प्रवाशांना गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी जेवणापासून सर्वच बाबींची कुचंबणा झाली.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Goa highway starts after 21 hours