सर्व्हैक्षणासाठी गृहभेटींवर भर, स्पर्धात्मक उपक्रमही, पहिला टप्पा झाला सुरू

विनोद दळवी 
Wednesday, 16 September 2020

ग्रामीण भागांत रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. अनलॉक सुरू झाले असून जनतेच्या मनातील भीती कमी होवू लागली आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासनाने 15 सप्टेंबर ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान दोन टप्प्यांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत गृहभेटींवर भर दिला असून स्पर्धात्मक उपक्रमही राबविण्यात येत आहे. यासाठी शहरी व ग्रामीण, असे दोन भाग आहेत. संस्था व वैयक्तिक पातळीवर बक्षीसे आहे. शासन आदेशानुसार जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू झाला आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकाऱ्यांना या मोहिमेबाबत कळविले आहे. 
ग्रामीण भागांत रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. अनलॉक सुरू झाले असून जनतेच्या मनातील भीती कमी होवू लागली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मोहीम कालावधीत किमान दोन वेळा भेट देवून त्यांना आरोग्य शिक्षणाचे संदेश देणे, मधुमेह, हृदयरोग, किडनी, लठ्ठापणा आदी आजारांच्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना कोरोना प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर आहे. दुसरा टप्पा 14 ते 24 ऑक्‍टोबर आहे. 25 ऑक्‍टोबरला या मोहिमेचा समारोप होईल. 
मोहिमेत लोकप्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहभागाला प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागात दोन पंच सदस्य तर शहरी भागात नगरसेवकांचा समावेश आहे. 

तीन व्यक्तींचे एक पथक 
एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक, अशा तीन व्यक्तींचे एक पथक स्थापन केले आहे. हे पथक दिवसभरात 50 घरांना भेटी देईल. एकूण घरांची संख्या निश्‍चित झाल्यावर तेवढी घरे 15 दिवसांत प्रत्येक दिवशी 50 संख्येप्रमाणे पूर्ण होतील एवढी पथके तयार करण्यात येणार आहेत. दुसऱ्या फेरीत दिवसाला 75 ते 100 घरांना भेटी देणार आहेत. ही पथके प्रशिक्षित असतील. 

व्यक्तीगत बक्षिसे 
सर्वोत्तम काम व्हावे, यासाठी बक्षीस स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, पालक व सामान्य व्यक्ती सहभागी होऊ शकेल. विधानसभा, जिल्हास्तर व राज्यस्तर अशा तीन टप्प्यांत बक्षिसे आहेत. एक ते तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. रोख बक्षीस व ढाल दिली जाणार आहे. निबंध, पोस्टर्स, मेसेजेस, शॉर्ट फिल्म अशा विविध स्पर्धा होणार आहे. विजेत्याच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यात येणार आहे. 

संस्थासाठी बक्षिसे 
मोहिमेअंतर्गत सर्वोत्तम काम करणाऱ्या संस्थाचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत व वॉर्ड यांना हिरवे, पिवळे व लाल कार्ड देण्यात येणार आहे. हिरवे कार्ड मिळालेल्या संस्थांना ढाल देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघ, जिल्हास्तर आणि राज्यस्तर यासाठी प्रत्येकी तीन क्रमांक काढले जाणार आहेत. त्यासाठी 10 हजार ते लाखाची बक्षिसे आहेत. 

सिंधुदुर्गातील कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला सहकार्य करावे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंनी शासन आदेशानुसार या मोहिमेत सहभाग घेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत. दोन टप्प्यांत ही मोहीम असून प्रत्येकापर्यंत पथके पोहोचणार आहेत. 
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family, my responsibility campaign start