लॉकडाऊनचा सदुपयोग - ‘मूकबधिर’चे माजी विद्यार्थी आत्मनिर्भर

मकरंद पटवर्धन
Thursday, 23 July 2020

 सुमारे महिनाभरयश देसाई व रुपेश झोरे  हे विद्यार्थी घरच्या घरी नागमूर्ती साकारत होते.

रत्नागिरी : येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आत्मनिर्भर होत आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात शाळेचे माजी विद्यार्थी अलीकडेच यश देसाई व रुपेश झोरे यांनी नागपंचमीसाठी शाडूच्या मातीपासून आकर्षक नागमूर्ती साकारल्या असून त्याची विक्रीसुद्धा आजपासून सुरू केली.

हेही वाचा- चाकरमान्यांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी कुणी लिहिली रेल्वे मंत्र्यांना पत्र -

 सुमारे महिनाभर हे विद्यार्थी घरच्या घरी नागमूर्ती साकारत होते. रंगकामही सुरेख केले आहे. या मूर्तींच्या विक्रीतून या दोघांनाही व्यवहारज्ञान कळणार आहे. श्रावण महिना सुरू होत असून 25 जुलैला नागपंचमी असल्याने आजपासून त्यांनी विक्री चालू केली आहे.दरवर्षी नागपंचमीला शाळेतच नागमूर्ती, हरितालिकेच्या मूर्ती बनवल्या जातात. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने माजी विद्यार्थ्यांनी नागमूर्ती साकारल्या. त्याकरिता त्यांना मुख्याध्यापक गजानन रजपूत, शिक्षक रमेश घवाळी यांनी मार्गदर्शन केले. लॉकडाऊनच्या काळात आत्मनिर्भर होण्याचा मंत्र या विद्यार्थ्यांना मिळाला. त्यातून रोजगारनिर्मिती झाली आहे.

हेही वाचा- पोरहो...रडायच नाही, लढायचय! टोकाच पाऊल उचलण्याआधी `हे` वाचाच... -

दि न्यू एज्युकेशन सोसायटीने 2 जुलै 1982 रोजी मूकबधीर विद्यालयाची स्थापना केली. त्या वेळी खेडोपाडी जाऊन विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या शाळेतील मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच भाषा, गणित आणि व्यवहारज्ञान शिकविले जाते. आत्मनिर्भर होण्यासाठी या मुलांना शाळेतच मूर्तिकाम, हस्तकला, सुतारकाम, शिवणकला या कला शिकवल्या जातात. या मुलांकडे हस्तकला खूपच सुरेख असल्याचे हस्तकला प्रदर्शनातून दरवर्षी पाहायला मिळते. विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावेत याकरिता संस्था व शाळा प्रयत्नशील आहे, असे मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nag panchami festival positive story in rajapur ratnagiri district Deaf school student rajapur