कुडाळचा विकास अडला कुठे ?

नगरपंचायतीनंतरची स्थिती काही प्रश्‍न सुटले, प्रगती दूर
Nagar Panchayat development of kudal Sindhudurg konkan update
Nagar Panchayat development of kudal Sindhudurg konkan updatesakal

कुडाळ शहराचा वाढता व्याप लक्षात घेता व सर्वांगीण विकास कसा साध्य करता येईल या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी नगरपंचायत अस्तित्वात आली. खरे पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळची ओळख आहे. नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी कुडाळ शहर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार चालत होता. कुडाळ शहराचे वाढते स्वरूप पाहता ग्रामपंचायतीच्या मर्यादा होत्या. विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. नगरपंचायत निर्मितीनंतर अनेक प्रश्‍न सुटले असे म्हटले तरी अजूनही काही समस्या कायम आहेत. नगरपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी आता नवी टीम सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळच्या विकास टप्प्यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न.

नगरपंचायत निर्मितीनंतर

कुडाळ शहर ग्रामपंचायत अस्तित्वात असताना येणारा निधी हा तुटपुंजा असल्यामुळे विकासाच्या दिशेने अडथळे येत होते. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व विकासाच्या दृष्टिकोनातून पाहता लोकसंख्या निकषानुसार पाच वर्षांपूर्वी कुडाळच्या सर्वांगीण विकासाचा वाढता वेग लक्षात घेता नगरपंचायत अस्तित्वात आली. पाच वर्षांच्या कालावधीत नगरपंचायतीचा विचार केला असता स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले. नगरपंचायत हद्दीतील वीज, रस्ते, पाणी हा प्रश्न प्राधान्याने सुटला; मात्र डम्पिंग ग्राऊंडचे कित्येक वर्षांचे भिजत राहिलेले घोंगडे अजून तसेच आहे. या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यावेळी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आंदोलने केली; मात्र अद्याप या प्रश्नाला यश आले नाही.

कामाची पोहोचपावती

कुडाळ नगरपंचायत हद्दीत सतरा प्रभाग येत असून त्या-त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी आपला प्रभाग स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून गेली पाच वर्षे कार्यरत असल्याचे दिसले. माजी नगराध्यक्ष तेली, राणे, सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून कुडाळ शहरात आमूलाग्र बदल होत असतानाच अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कुडाळ म्हणून ओळखले जाते. बाजारपेठही मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कुडाळची ऐतिहासिक ओळख आहे. या बाजारपेठेच्या अनुषंगाने व सर्वांगीण सुंदर कुडाळ शहर होण्यासाठी त्यावेळी माजी नगराध्यक्ष तेली व राणे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले उपक्रम राबविले. शहराच्या विकासासाठी अपवाद वगळता राजकीय वाद निर्माण झाले नाहीत. पाच वर्षांचे एकंदर चित्र पाहता कुडाळ शहर विकासाकडे वाटचाल करीत असतानाच नावीन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबविले गेले. यामध्ये केळबाई मंदिर परिसरातील अद्ययावत व सार्वजनिक स्मशानभूमी, मच्छीमार्केटचा उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे कुडाळ बसस्थानकाच्या परिसरात माजी नगराध्यक्ष तेली यांच्या संकल्पनेतून साकारलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला ‘आय लव्ह कुडाळ’ सेल्फी पॉईंटही लक्षवेधीच म्हणावा लागेल.

लक्षवेधी प्रकल्प

कुडाळ बसस्थानक अधिक लक्षवेधी होण्यासाठी लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे गरजेचे आहे. बसस्थानकावर इमारत उभी राहिली; मात्र अद्यापही या ठिकाणी खडीकरण न झाल्यामुळे हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या विकास दालनांपैकी क्रीडांगण, मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने सुरू असणारे नाट्यगृह, महिला हॉस्पिटल हे कुडाळचे जणू वैभवच. नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्ते चांगले झाले; पण काही खड्डेमय आहेत.

डंपिंगचा प्रश्न जटिल

ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून डंपिगची सर्व व्यवस्था ही भंगसाळ नदी पात्रानजीक असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीच्या ठिकाणी होत होती. याच्या परिसरात नागरी वस्ती असल्यामुळे लोकांना आरोग्याच्या अनेक संकटाना सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या सातत्याने उद्‌भवणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने डंपिंग व्यवस्था तेथून सांगिर्डेवाडी या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला.

यासाठी माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांचे मोठे योगदान होते. नगरपंचायत प्रशासनासह माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनीसुद्धा डम्पिंगची पर्यायी व्यवस्था करावी यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

एकत्र प्रयत्न हवे

कुडाळचा सर्वांगीण विकास साधताना सर्वांनी राजकीय पादत्राणे बाहेर ठेवली पाहिजेत. निवडणुकांपुरते राजकारण ठेवून विकासासाठी सर्वजण एकत्र आल्यास गेली काही वर्षे खोळंबलेले अनेक प्रश्न मार्गी लागून जिल्ह्यात ही नगरपंचायत विकाससह शासनाच्या सर्व उपक्रमांत पुढे जावी या दृष्टीने सर्वपक्षीय एकत्र आले पाहिजेत. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना लोकसभा गटनेते विनायक राऊत, आमदार नाईक तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांचाही कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागला आहे. हेच एकत्रित प्रयत्न झाले तर कुडाळ वैभव शिखरावर पोहोचेल.

अतिक्रमण आटोक्यात

ग्रामपंचायत अस्तिवात असताना सातत्याने वाढते अतिक्रमण हा गंभीर विषय होता. बरीच वर्षे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस यंत्रणा, बांधकाम विभागाच्या माध्यमातूनही हा प्रश्न सुटत नव्हता. त्या-त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भेट देऊन ही समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविले; पण त्याला फारसे यश आले नव्हते. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. आता बऱ्यापैकी शहरातील अतिक्रमण दूर झाल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी तसेच नगरअभियंता विशाल होडावडेकर यांनी ही मोहीम चांगली राबविली आहे.

अतिक्रमण आटोक्यात

ग्रामपंचायत अस्तिवात असताना सातत्याने वाढते अतिक्रमण हा गंभीर विषय होता. बरीच वर्षे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस यंत्रणा, बांधकाम विभागाच्या माध्यमातूनही हा प्रश्न सुटत नव्हता. त्या-त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भेट देऊन ही समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविले; पण त्याला फारसे यश आले नव्हते. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. आता बऱ्यापैकी शहरातील अतिक्रमण दूर झाल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी तसेच नगरअभियंता विशाल होडावडेकर यांनी ही मोहीम चांगली राबविली आहे.

कुडाळच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कटिबद्ध राहणार आहे. माझ्यावर नगराध्यक्षपदाची जी जबाबदारी सोपवली ती प्रामाणिकपणे पार पाडेन. सर्वांना सोबत घेऊन काम करताना शहरात प्रलंबित प्रश्न व विकासाचे काय मुद्दे आहेत या दृष्टीने कार्यरत राहीन.

- आफ्रिन करोल, नगराध्यक्ष

कुडाळच्या सर्वांगीण विकासात मच्छी मार्केट डपिंग व भाजी मार्केट हे तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाच वर्षांत सर्वांच्या सहकार्याने स्तुत्य उपक्रम राबविले. राजकारण बाजूला ठेवून माजी नगराध्यक्ष म्हणून विकासासाठी नव्या टीमला नेहमीच सहकार्यासाठी कार्यरत राहीन.

- ओंकार तेली, माजी नगराध्यक्ष

पाच वर्षांत कुडाळचा म्हणावा तसा विकास झाला नाही. चौपदरीकरण, भुयारी गटार, पार्किंग व फुटपाथ बांधणे, प्रशस्त भाजी मार्केट, उत्कृष्ट मच्छी मार्केट, २४ तास पाणी, रस्ता दुतर्फा वीज, मुलांसाठी गार्डन, नाना नानी पार्क, भंगसाळ नदीवर बोटिंग, ऐतिहासिक घोडेबांब, कुडाळ गोंधळवाडी तलाव सुशोभीकरण करावे.

- सुनील भोगटे, माजी सभापती

नगरपंचायतीच्या माध्यमातून कुडाळचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. बालोद्यान, ज्येष्ठांसाठी गप्पाटप्पा पॉईंट, रस्ता दुतर्फा फुटपाथ असे विविध उपक्रम राबवण्यासाठी नगरपंचायतीने राजकारणविरहित पावले उचलावीत.

- प्रशांत राणे, माजी सरपंच, कुडाळ

नगरपंचायत हद्दीत अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न होता. सर्वांच्या सहकार्याने जवळपास ९० टक्के प्रश्न मार्गी लागला आहे. रस्ता दुतर्फा अतिक्रमण काढल्याने रस्ता रुंद झाला आहे.

- विशाल होडावडेकर, नगर अभियंता, कुडाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com