esakal | पुन्हा येणारच्या जाहिरातीने संशयकल्लोळ 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanar Advertise In News Paper Creates Doubt Ratnagiri Marathi News

मी पुन्हा येणार... या शब्दशः अर्थाप्रमाणे नाणार ग्रीन रिफायनरीचा विषय सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी ग्रीन रिफायनरी रद्दची घोषणा केली.

पुन्हा येणारच्या जाहिरातीने संशयकल्लोळ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मी पुन्हा येणार... या शब्दशः अर्थाप्रमाणे नाणार ग्रीन रिफायनरीचा विषय सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी ग्रीन रिफायनरी रद्दची घोषणा केली. सेनेचे मुखपत्र "सामना'ला पहिल्या पानावर रिफायनरीची मोठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रिफायनरी पुन्हा आणण्याचा घाट घातला जात असल्याचा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. मात्र, खासदार विनायक राऊत यांनी याचा इन्कार केला. प्रकल्प पुन्हा आणण्याचा विचार होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

रत्नागिरीत दौऱ्यानिमित्त आले असता राऊत रिफायनरीबाबत म्हणाले, सामना हे शिवसेनेचे जरी मुखपत्र असले, तरी हे वृत्तपत्र आहे. वृत्तपत्रामध्ये इतर जाहिराती येतात तशीच रिफायनरीचीही जाहिरात आली असेल. मात्र, कंपनी मनात मांडे खात असेल. परंतु, सरकारने हा प्रकल्प केव्हाच गुंडाळाला आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा प्रकल्प हवा म्हणत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री या प्रकल्पाबाबत कोणताही विचार करणार नाहीत. 

देशातील सर्वांत मोठा रिफायनरी प्रकल्प केंद्राने नाणार येथे प्रस्तावित केला होता. 3 लाख कोटींची गुंतवणूक होती. दीड लाखाहून अधिक लोकांना रोजगार संधी प्रकल्प उभारताना अन्‌ उभारणीनंतर 20 हजार लोकांना थेट रोजगार मिळेल असा कंपनीचा दावा होता. स्थानिकांच्या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने विरोधाला व्यापक स्वरूप आले. तत्कालीन सत्ताधारी भाजप विरोधात सेना आमनेसामने ठाकली. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्प रद्द करण्याचा शब्द दिला होता. सेनेने दबाव टाकून हा प्रकल्प रद्द केला. लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असताना रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली. तेव्हापासून रिफायनरीचा विषय संपुष्टात आला होता. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रिफायनरीची मोठी जाहिरात आल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले. 

आयलॉग स्थानिकांना हवा तर विरोध नाही 

राजापूर आमदारांचा आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे, तर स्थानिकांना तो प्रकल्प हवा आहे. सेनेची भूमिका विसंगत दिसते, यावर खासदार राऊत म्हणाले, आयलॉग प्रकल्प तेवढा घातक नाही. ग्रामपंचायतीने प्रकल्पाचे स्वागत केले आहे. एनओसी दिली आहे, जागा दिली आहे. त्याला विरोध करण्याची आवश्‍यकता नाही. स्थानिकांनी स्वीकारले आहे तर आम्ही त्याला विरोध करू शकत नाही. नाटे आणि आंबोळगडबाबत विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न करू.  

 
 

loading image