सेना घेणार आता नाणार समर्थकांची दखल.... ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

लोकांना प्रकल्प नको असल्यास विरोध, लोकांना हवा असल्यास समर्थन, अशी भूमिका घेत शिवसेनेने नाणारला विरोध केला.

राजापूर (रत्नागिरी ) : लोकांना प्रकल्प नको असल्यास विरोध, लोकांना हवा असल्यास समर्थन, अशी भूमिका घेत शिवसेनेने नाणारला विरोध केला. आता शिवसैनिकांसह जनताही प्रकल्पाचे समर्थन करत आहे. शिवसेना नेतृत्व या आवाजाची दखल घेणार का, प्रकल्प हवा आहे असे म्हणणार्‍यांच्या बाजूने शिवसेना उभी राहणार का? याकडे आता सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

 लोकांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा, अशी भूमिका घेत शिवसेनेने नाणार प्रकल्प विरोधकांना पाठबळ देत नाणारविरोधी भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर, नाणारचा विषय आता संपला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. असे असताना डोंगरतिठा येथे झालेल्या सभेमध्ये प्रकल्प समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे नाणारबाबत शिवसेना आपली पूर्वीची भूमिका बदलणार का याची चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा- सावंतवाडीच्या त्या वादात ‘महाविकास’ची उडी....

लोकांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा
गेल्या दोन वर्षापासून नाणार रिफायनरी प्रकल्प चांगलाच गाजत आहे. गेली काही वर्षे प्रकल्पग्रस्तांनी नाणारच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनांमध्ये शिवसेना सहभागी झाली होती. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची शासनस्तरावर अधिसूचना रद्द करण्यामध्येही सेनेने महत्वाची भूमिका बजावली. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द केल्याचे श्रेयही प्रकल्प विरोधी लोकांनी शिवसेनेला दिले होते. त्याचा शिवसेनेला या परिसरामध्ये राजकीयदृष्ट्याही काहीसा फायदा झाला.

हेही वाचा-  सुधारित दस्ताचा नागरिकांना आता बसणार फटका..

समर्थकांपेक्षा प्रकल्प विरोधकांची संख्या जास्त

दोन दिवसांपूर्वी सागवे येथे झालेल्या नाणार विरोधी जाहीर सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेनेने प्रकल्प विरोधी नारा दिला. मात्र, त्यानंतर डोंगरतिठा येथे प्रकल्प समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले. गेल्या वर्षभरामध्ये प्रकल्प समर्थकांपेक्षा प्रकल्प विरोधकांची संख्या जास्त असल्याचे चित्र जास्त दिसत होते. मात्र, काल डोंगरतिठा येथे झालेल्या प्रकल्प समर्थन सभेमध्ये प्रकल्प समर्थकांचाही आवाज घुमला आहे. हा आवाज फक्त राजापूरवासीयांचा नव्हता तर, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचाही होता.    

  हेही वाचा- चिपळूणात  बेकरीला लागली भीषण आग...

शिवसेनेच्या भूमिकेला विशेष महत्व

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे मिळून राज्यामध्ये महाविकास आघाडी शासन आहे. त्यामध्ये शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवरून नाणार रिफायनरीबाबत शासनाची भूमिका ठरण्याची शक्यता आहे. नाणारबाबत शिवसेनेच्या भूमिकेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nanar project in rajapur ratnagiri marathi news