चिपळूणातील नारायण तलाव गर्दुल्लेंचा अड्डा; कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रॉयल नगर तसेच प्रभात रोड परिसरात हा ऐतिहासिक नारायण तलाव आहे. तलावाची दुरुस्ती करून सुशोभीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांची होती.

चिपळूण ( रत्नागिरी ) - कोटयवधी रुपये खर्च पडलेला चिपळूण शहरातील नारायण तलाव आता गर्दुल्ले आणि तळीरामांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून स्थानिकांनी आता थेट पालिका तसेच पोलिसात धाव घेण्याची तयारी केली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हे घडत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. 

चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रॉयल नगर तसेच प्रभात रोड परिसरात हा ऐतिहासिक नारायण तलाव आहे. तलावाची दुरुस्ती करून सुशोभीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांची होती. त्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी निधी मंजूर करून दिला आणि प्राथमिक स्वरूपात येथील गाळ काढून तलावाची साफसफाई तसेच परिसराची स्वच्छता अशी कामे करण्यात आली. 

नारायण तलावाचे सुशोभीकरण हे अत्याधुनिक पद्धतीने व्हावे त्यासाठी एक आराखडादेखील तयार करण्यात आला तसेच डिझाइन तयार करून त्याचे सादरीकरणदेखील पालिकेत करण्यात आले. त्यामुळे नारायण तलावाच्या कामाला गती मिळेल आणि लवकरच सुसज्ज देखणा तलाव चिपळूण शहराच्या वैभवात भर घालेल, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. परंतु सरकार बदलले. वायकर यांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे नारायण तलावाचे काम पूर्णपणे ठप्प पडले. आता तर नारायण तलावाची दुरवस्था झाली असून परिसरात प्रचंड झाडीझुडपे वाढली आहेत. तलावात पुन्हा एकदा गाळ साचण्यास सुरवात झाली आहे. 

ऐतिहासिक नारायण तलाव आता गर्दुल्ले आणि मद्यपींचा अड्डा बनला आहे. दुपारी आणि रात्री येथे गर्दुल्ले धूर काढत बसलेले असतात तसेच आरडाओरडा आणि ओरडदेखील सुरू असते. रात्री मद्यपींचा धुडगूस येथे सुरू असतो. परिसरात सिगारेटची पाकिटे आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. पोलिस आणि पालिकेच्या प्रशासनाने लक्ष द्यावे. 
- श्‍यामाकांत इनामदार, मार्कंडी, चिपळूण  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Lake in Chiplun Becomes Druggist Persons Spot