शिवसेनेत 'हे" आल्यास भाजप राणेंना पक्षप्रवेश देण्याची शक्यता

शिवसेनेत 'हे" आल्यास भाजप राणेंना पक्षप्रवेश देण्याची शक्यता

सावंतवाडी - कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्प्यावर आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून, त्यांनी राणेंसारखे वजनदार नेते आम्हाला हवे आहेत; मात्र शिवसेनेला विश्‍वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र युतीमध्ये दुरावा झाल्यास शिवसेना छगन भुजबळ पक्षात घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास भाजप राणेंचा पक्षप्रवेश करून घेण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आक्रमक नेते म्हणून राणेंची ओळख आहे. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक राजकीय घडामोड मीडियामध्ये चर्चेचा विषय असतो. आताही त्यांचा संभाव्य भाजप प्रवेश राज्याच्या राजकारणात "हॉट' विषय ठरला आहे. 

कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या राणे यांनी सत्तेत असलेल्या भाजपशी हातमिळवणी केली. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते "कमळ' हाती घेतील, असा अंदाज होता. मात्र, पडद्यामागे रंगलेल्या राजकारणानंतर राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. या पक्षाचा भाजपला पाठिंबा दिला. मात्र, युतीतील भागीदार पक्ष असलेल्या शिवसेनेबरोबरचा दुरावा कायम राहिला.

राणेंच्या भाजप प्रवेशात शिवसेनेचा अप्रत्यक्ष अडसर असल्याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान भाजपने वर्षभरापूर्वी राणेंना राज्यसभेची खासदारकी दिली. राणेंना दिल्लीच्या राजकारणात जायची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी काहीशा नाईलाजाने हे पद स्वीकारले. गेल्या लोकसभेवेळी राणेंच्या स्वाभिमान पक्षाने युतीच्या विरोधात सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर मात्र भाजपशी मैत्री असल्याचे स्पष्ट केले. 

राणेंचे राजकीय वर्चस्व प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, तेथे विधानसभेच्या तीन जागा आहेत. येथे युतीविरोधात स्वाभिमानची लढाई झाल्यास मोठी चुरस होणार आहे. राणे युतीचे किंवा भाजपचे सहयोगी पक्ष झाल्यास जिल्ह्यात वर्चस्व मिळवणे सोपे होणार आहे. शिवाय राणेंना राज्याच्या राजकारणात परतायचे आहे. त्यांचे पुत्र नीतेश राणे हेही आमदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी रिंगणात उतरणार आहेत. या सगळ्याचा विचार करता राणेंना विधानसभेची पुढची मोर्चेबांधणी करायला फार कमी अवधी उपलब्ध आहे. 

या पार्श्‍वभूमीवर भाजप प्रवेशाबाबत स्वतः राणे आग्रही आहेत. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. त्या दोन्ही नेत्यांनी राणेंच्या प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर राणे आणि फडणवीस यांचीही चर्चा झाली.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राणे यांनी भाजप प्रवेश किंवा आगामी वाटचालीबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. किती दिवस वाट पाहायची यालाही मर्यादा असल्याचे स्पष्ट केले आहे. या सगळ्या घटनाक्रमांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना "राणेंसारखा वजनदार नेता भाजपला हवा आहे. मात्र, आमची शिवसेनेशी युती आहे. त्यांनाही विश्‍वासात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. राणेंना राज्यसभेची खासदारकी देतानाही शिवसेनेला कळवले होते,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

इनकमिंगची चढाओढ 
शिवसेना आणि भाजप यांची युती विधानसभेत टिकणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युती न झाल्यास राणेंचा भाजप प्रवेश सोपा असणार आहे. मात्र, युती अभेद्य राहिल्यास राणेंबाबत भाजप काय भूमिका घेणार, हा प्रश्‍न आहे. युती झाली आणि राणे भाजपमध्ये गेल्यास कोकणात जागा वाटपातही फेरबदल करावे लागणार आहेत. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये इतर पक्षांतील वजनदार नेत्यांच्या इनकमिंगची चढाओढ सुरू आहे. छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास भाजप राणेंचा पक्षप्रवेश करून घेण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com