'शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राणेंसारख्या तगड्या नेतृत्वाचा भाजपला उपयोग'

narayan rane is on konkan tour appeal to activist in ratnagiri for BJP policy spreading
narayan rane is on konkan tour appeal to activist in ratnagiri for BJP policy spreading

रत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला एकवेळ संधी द्या, असे आवाहन करतानाच शिवसेनेवर आसूड ओढत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यात ऊर्जा निर्माण केली आहे. बालेकिल्ल्यात शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राणेंसारख्या तगड्या नेतृत्वाचा निश्‍चित भाजपला उपयोग होणार असून, सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल, असा विश्‍वास राणेंनी दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा जम बसलेला आहे; मात्र जिल्ह्यात सगळीकडेच सावळा गोंधळ आहे. कोकणात तगडे नेतृत्व निर्माण करण्याची भाजपला मोठी गरज आहे. ती संधी नारायण राणेंच्या रूपाने मिळाली आहे. ती भूमिका राणे बखुबी निभावून नेऊ शकतील. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीने पाय पसरलेले आहेत. भाजपचा टक्‍का विखुरल्याप्रमाणे आहे. ही ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून खासदार नारायण राणे यांना रत्नागिरीच्या रणात उतरविण्यात आले आहे.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेतून राणेंनी त्याचे सूतोवाच केले. कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यापूर्वी माजी खासदार नीलेश राणेंनी सातत्याने रत्नागिरीचे दौरे करत भाजपा कार्यकर्त्यांना जोर देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड हे या मतदारसंघाचे दौरे करीत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ दुर्लक्षित नेत्यांच्या गाठीभेटीही घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता.

दोन महिन्यांनी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायंतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यात कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम या दौऱ्याने साध्य होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून रत्नागिरी पालिकेतील जागेच्या प्रश्‍नाव्यतिरिक्‍त शिवसेनेला कचाट्यात अडकवण्यासाठी एखाद्या स्थानिक जिव्हाळ्याचा विषय लावून धरल्याचे उदाहरण विरळच आहे. त्यामुळे राणेंची रत्नागिरी भेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी सकारात्मक ठरणार आहे.

‘इनकमिंग’च्या मोहिमेला बळ

पक्ष वाढविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना राणेे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या असून, जे कोणी पक्षात येऊ शकतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा, असे सांगितले. त्यासाठी स्वतः बोलण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाराजांना समाविष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेला बळ मिळेल.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com