नारायण राणे एनडीएसोबतच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

कणकवली - खासदार नारायण राणे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले; मात्र दुपारी खुद्द राणे यांनीच आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला

कणकवली - खासदार नारायण राणे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले; मात्र दुपारी खुद्द राणे यांनीच आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उमेदवार नीलेश राणे यांना पराभवाचा धक्‍का बसला. त्यानंतर या निकालाबाबतची आपली प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरी आणि पडवे येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली होती. त्यानंतर आज श्री. राणे हे हेलिकॉप्टरने तातडीने गोवा येथे गेले. तेथून विमानाने ते दिल्ली येथे पोचले. राणे यांनी तातडीने दिल्ली गाठल्याने ते काँग्रेस पक्षातील प्रमुखांशी चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्र वाहिन्यांनी दिले.

त्यानंतर याबाबतची खातरजमा करण्यासाठी अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही संपर्क साधला होता. दुपारी तीन वाजेपर्यंत राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.
दुपारी तीन वाजल्यानंतर खुद्द राणे यांनीच आपण एनडीएच्या बैठकीसाठी दिल्ली येथे तातडीने आल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस प्रवेशाच्या वावड्या निराधार असल्याचीही माहिती दिली. यानंतर राणेंच्या काँग्रेस प्रवेशबाबतची चर्चा थांबली.

राणेंच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
राणेंनी काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले असले, तरी त्यांची पुढील भूमिका काय असेल? याचीही चर्चा आणि उत्सुकता जिल्हावासीयांना आहे. मोदींच्या लाटेचा फटका विरोधकांसह सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांना बसला. आगामी विधानसभेतही शिवसेना-भाजप युती भक्‍कमपणे झाली, तर आमदार नितेश राणे यांचा कणकवली मतदारसंघदेखील धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार नारायण राणे कोणता निर्णय घेतात, याचीही प्रतीक्षा जिल्ह्यावासीयांना आणि राणेसमर्थकांना आहे.

Web Title: Narayan Rane with NDA