राणे आता राजकिय संन्यासात गेलेत, `यांनी` केली टीका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

""नारायण राणेंसारखी राजकीय माणसे आता संन्यासश्रमात गेली आहेत. आता त्यांच्याकडेच काही नसल्याने भाजपचे मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बीनबुडाचे आरोप सुरू केले आहेत.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पडवे येथील खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलला येथील जनतेच्या हितासाठी दोन महिन्यांपूर्वीच ग्रीन सिग्नल दिला होता हे राणेंनी विसरू नये. राणेंना आता आरोप करण्यापलीकडे काही जमत नाही. भाजपने त्यांना निमंत्रित सदस्य करून कायमचे गप्प केले आहे. आता ते राजकीय संन्यासात गेलेत. त्यांनी कार्यतत्पर जनतेचे हित जोपासणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा इशारा लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

खासदार राऊत यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या वेळी श्री. राऊत म्हणाले, ""नारायण राणेंसारखी राजकीय माणसे आता संन्यासश्रमात गेली आहेत. आता त्यांच्याकडेच काही नसल्याने भाजपचे मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बीनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. भाजपमध्ये आपल स्थान बळकट करण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. इतर 78 प्रमाणे राणेंना भाजप कार्यकारणीत निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

त्यामुळे भाजपने राणेंना त्यांची जागा दाखवुन दिली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना उद्धव ठाकरे यांनी देशात पहिल्या पाच राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात नेवून ठेवले आहे. केंद्रीय आरोग्य पथकाने ठाकरे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे काम मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. दिल्लीच्या कोरोनावर काबू मिळविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयत्नशील आहेत; मात्र छोट्या दिल्लीत एक लाख दहा हजार कोरोनाचे रुग्ण असून त्यापेक्षा मुंबई ऐवढी मोठी असून कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम ठाकरे यांनी केले आहे. निसर्ग वादळात कोकणाला भरपूर नुकसान भरपाई देण्याचे काम ठाकरे यांनी केले आहे.'' 

ते म्हणाले, ""राणे यांच्या पडवे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव बरीच वर्षे प्रलंबित होता. या वेळी राणे यांनी तुम्ही हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी केली होती; पण हे मेडिकल कॉलेज एका क्षणात मंजूर करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगेच सही करून मंजुरी दिली.'' 

आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अभय शिरसाट, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गीतेश राऊत, रुची राऊत, राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, सचिन काळप, संतोष शिरसाट, संजय भोगटे, राजू गवंडे, संदीप राऊळ, मिलिंद नाईक, संदेश निकम, कृष्णा तेली, संदीप कोरगावकर, मंजूनाथ फडके, उदय मांजरेकर आदी उपस्थित होते. 

रत्नागिरी, सिंधुदुर्गात लवकरच कोविड रुग्णवाहिका 
कोरोनाचे संकट रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आटोक्‍यात आहे. दोन्ही ठिकाणी अद्ययावत लॅब मशीन असून लवकरच कोविड रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Now Retired From Politics Vinayak Raut Comment