चक्रीवादळाने नुकसान झाले पण पंचनामा नाहीच ....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

चक्रीवादळाने नुकसान झाले पण  पंचनामा नाहीच .... 

विचारणा करण्यास गेलेल्या महिलांनाच अध्यक्षांनी केली धक्काबुक्की ... कोठे वाचा 

चक्रीवादळाने नुकसान झाले पण  पंचनामा नाहीच .... 

विचारणा करण्यास गेलेल्या महिलांनाच अध्यक्षांनी केली धक्काबुक्की ... कोठे वाचा 

दाभोळ : चक्रीवादळाने झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केळशी गावातील कांदेवाडी येथील 11 ग्रामस्थांनी आमच्या वाडीत कोणतेच नुकसान झाले नाही, असा अर्ज दिला. मात्र ज्यांच्या घरांचे नुकसान झाले होते, अशा महिलांनी वाडी अध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता वाडी अध्यक्षांच्या पत्नीने व अन्य उपस्थितांनी शिवीगाळ करून धक्‍काबुक्‍की केल्याची तक्रार योगिता योगेश खांबे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल केला. 

 दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी 23 जूनला आले होते. ते पाहणी करून गेल्यानंतर कांदेवाडीतील 11 जणांनी आमच्या वाडीतील कोणाचेही नुकसान झालेले नाही, असा अर्ज केळशी ग्रामपंचायतीत दिला होता. या अर्जाबाबत चर्चा करण्यासाठी योगिता खांबे व अन्य 14 महिला शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी  वाडी अध्यक्ष अनंत यशवंत मिसाळ यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांनी 27 जूनला सकाळी 8 वाजता कांदेवाडी येथे बैठक घेऊन त्या अर्जाबाबत चर्चा करू, असे सांगितले. हे सांगितल्यावर योगिता खांबे व त्यांच्याबरोबर असलेल्या महिला परत जात असताना अध्यक्षांच्या पत्नी अस्मिता अनंत मिसाळ यांनी तुम्ही कोणीही येथून जायचे नाही, मी माझ्या माणसांना बोलावून घेते, असे सांगून त्यांनी त्यांच्या माणसांना बोलावून घेतले. या सर्वांनी योगिता खांबे व त्यांच्यासोबत आलेल्या महिलांना शिवीगाळ करून, धक्‍काबुक्‍की केली, हाताने तसेच काठीने मारहाण केली व सर्वांना मारून टाकतो व सर्वांचा निकाल लावतो, अशी धमकी दिल्याची तक्रार योगिता खांबे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारीनुसार अस्मिता अनंत मिसाळ, अनंत यशवंत मिसाळ व अन्य 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास हेड कॉन्स्टेबल येडे करत आहेत. 

हेहि वाचा : हॉटस्पॉट मणदूरला पाच गावांचा हिरवा हात!; अशी केली मदत

तक्रार घेण्यास नकार 
तक्रार दाखल करण्यासाठी केळशी येथून रात्री दापोली पोलिस ठाण्यात आलेल्या या महिलांची तक्रार घेण्यास ठाणे अंमलदारांनी नकार दिला. पोलिस ठाण्याच्या आवारातून या महिलांना निघून जाण्यास सांगितले. कोणी पोलिस ठाण्याच्या आवारात दिसलात तर गुन्हा दाखल करण्याची धमकीही अंमलदाराने या महिलांना दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावचे सरपंच महेंद्र रेवाळे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ही घटना पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या कानावर घातल्यावर पाटील यांनी या महिलांची तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिल्यावर अंमलदार यांनी तक्रार दाखल करून घेतली. 
दरम्यान, यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी जमावाला पोलिस ठाण्याबाहेर थांबून केवळ फिर्यादीने आत थांबावे, असे सांगितल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nature hurricane immpact in dapoli (ratnagiri)