कोकणातील चार शतकाची भुत्यांची परंपरा अस्ताच्या वाटेवर 

navratri festival 400 years of history story by amit pandit ratnagiri
navratri festival 400 years of history story by amit pandit ratnagiri

साखरपा (रत्नागिरी) : नवरात्र म्हटलं की घरोघरी येणारे देवीचे भुत्ये हे हमखास आठवतात. हातात तुणतुणे घेऊन घराघरात जावून देवीची आरती म्हणणारे सरवदे समाजातील भुत्यांच्या परंपरेला ४०० वर्षांचा इतिहास आहे. पण सध्या ही परंपरा अखेरच्या घटका मोजत आहे. 

संगमेश्वर तालुक्यात नवरात्रातील भुत्यांची परंपरा मोठी आहे. तालुक्यातील चाफावली गावात सरवदे समाज रहातो. तो ही परंपरा गेली चार शतकं जोपासत आला आहे. शहाजी राजांनी ही परंपरा सुरू केली. प्रारंभी हे लोक बहुरूपी म्हणून गावागावात जाऊन तिथली माहिती काढत. गुप्त हेर म्हणून ते समाजात वावरत. नंतर नवरात्रातून हे भुत्ये आपआपल्या नियोजित गावात जावून देवीची आरती सादर करत.

ज्या गावात ते जात त्या गावातील महसूल गोळा करण्याचं काम शहाजी राजांनी त्यांना दिलं. त्यासाठी त्यांना ताम्रपत्र देऊन तो अधिकार त्यांना दिला. जमा  झालेल्या महसूलापैकी एक हिस्सा स्वतः ठेऊन उर्वरित तीन हिस्से ते राजांना देत असत. त्यामुळे त्यांचा चरितार्थ त्या उत्पन्नावर चालत असे. पेशवे काळ आणि त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी ह्या परंपरेत मोठा बदल केला. केवळ नवरात्रातील नऊ दिवसांचा महसूल स्वतःकडे ठेऊन उर्वरित सगळा महसूल सरकारला देण्याची प्रथा इंग्रजांनी सुरू केली आणि चरीतार्थाचा मोठा प्रश्न प्रथमच उभा राहिला. स्वातंत्र्यानंतर मात्र महसूल वसूली पूर्ण बंद झाली आणि तुणतुणे, आरती परंपरा कायम राहिली. 


नवरात्रातले नऊ दिवस हे भुत्ये गावात जावून राहतात. सकाळी आधी ग्रामदेवतेच्या देवळात आरती करतात आणि गावात घरोघरी फिरण्यास सुरुवात करतात. संध्याकाळी पुन्हा ग्रामदेवतेच्या  देवळात आरती होते. हा नेम नऊ दिवस सुरू असतो. गळ्यात कावड्यांची माळ, हातात तुणतुणे, गळ्यात देवीचा देव्हारा आशा अवस्थेत नऊ दिवस अनवाणी हे भुत्ये गावात फिरून आरती म्हणतात. त्या बदल्यात त्यांना घरटी पायलीभर धान्य देण्याची प्रथा आहे. ह्या प्रथेला उकळ म्हणतात. काळाच्या ओघात धान्याची उकळ बंद झाली आणि आता आर्थिक स्वरूपात ही उकळ केली जाते.


गेली ४०० वर्षे सुरू असलेली ही तुणतुणे परंपरा अस्ताच्या मार्गावर आहे. सरवदे समाजाला शिक्षणाचे महत्व पटल्याने त्या समाजातील पुढची पिढी उच्चशिक्षित झाली, नोकरी व्यवसायात स्थिरस्थावर झाली. त्यामुळे ही पिढी तुणतुणे परंपरा चालवण्यास उत्सुक दिसत नाही. पुढील दशकभरात ही परंपरा अस्ताला जाण्याच्या उंभरठ्यावर उभी आहे. 

  तुणतुणे परंपरा ही आमच्या समाजाची ओळख आहे. गेली चार शतके ही परंपरा आम्ही चालवली पण आता पुढची पुढील त्याबद्द्ल उत्सुक नाही याची खंत वाटे .
प्रकाश रसाळ, तुणतुणे वादक 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com