कुडाळच्या नवरात्रोत्सवाला 350 वर्षांचा वारसा 

अजय सावंत
Sunday, 25 October 2020

ऐतिहासिक संदर्भ असलेले येथील भवानी माता मंदिर असून ते वाघसावंतटेब या ठिकाणी आहे. या भागात असणारी मंदिरे, मठ आणि त्यांच्या परंपरा अनोख्या आणि अद्‌भुत अशाच आहेत. कुडाळ पूर्वीपासून सत्तेचे केंद्र होते.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - संस्थानकाळातील 350 वर्षांपूर्वीच्या नवरात्रोत्सवाचा वारसा वाघ सावंत टेंब येथील श्री देवी भवानी माता मंदिरात जोपासला जात आहे. कोरोनाचे नियम पाळून हा सोहळा यंदा साजरा केल्याचे सुभाष सावंत-प्रभावळकर यांनी सांगितले. आता दसरोत्सवही ऐतिहासिक परंपरा जपून साजरा केला जाणार आहे. 

ऐतिहासिक संदर्भ असलेले येथील भवानी माता मंदिर असून ते वाघसावंतटेब या ठिकाणी आहे. या भागात असणारी मंदिरे, मठ आणि त्यांच्या परंपरा अनोख्या आणि अद्‌भुत अशाच आहेत. कुडाळ पूर्वीपासून सत्तेचे केंद्र होते. कुडाळ देश या प्रांताची ही राजधानी होती. भवानी मंदिर आणि या उत्सवाची माहिती देताना वाघसावंतटेब येथील सुभाष सावंत-प्रभावळकर म्हणाले, ""शहरात संस्थांनकाळातील प्रबळ घराणी म्हणजे खासेसावंत प्रभावळकर होय. प्रभावळकर हे मूळ प्रभानवल्लीचे होय. इतिहास काळात शिवाजी महाराजांच्या मोहिमेत महाराजांनी त्यांना समाविष्ट करून घेतले होते.

त्यांची कामगिरी पाहून त्यांना पुन्हा प्रांतातील जमिन इनाम देऊन सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. तो कालावधी 1664 चा होता. त्यावेळची सूर्याजी गाळवी म्हणून या ठिकाणला संबोधले जायचे हे ठिकाण आज वाघसावंत टेंब म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी असलेले भवानी मातेचे मंदिर राजघराण्यांच्या भवानी आई मंदिराची प्रतिकृती आहे. शिवाजी महाराजांनी ऑक्‍टोबर 1664 मध्ये कुडाळ जिंकून घेतले. 26 नोव्हेंबर 1664 ला मोठा धार्मिक विधी करून मालवण किल्ल्याची पायाभरणी केली. राजा सूर्यभान प्रभावल्लीकर या समारंभाला हजर होते. पुढे सत्तांतराच्या काळात हे वैभव गेले; मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत या घरांण्याने स्वातंत्र्याची कास कायम करून ठेवली आहे. आजही कुडाळ येथील पूर्वीचे सूर्याची गाळवी या ठिकाणी असलेल्या भवानीमंदिरात त्रैवार्षिक गोंधळ, दसरा आदी धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.'' 

राज घराण्याचा इतिहास सांगणाऱ्या श्री भवानी माता मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सुभाष सावंतप्रभावळकरसह विजय सावंतप्रभावळकर, राजू सावंतप्रभावळकर, नामदेव सावंतप्रभावळकर, अनिष सावंतप्रभावळकर, नागेश राणे, सचिन मिहिते, शार्दूल सावंतप्रभावळकर, रविंद्र सावंतप्रभावळकर, चैतन्य सावंतप्रभावळकर, महेश सावंतप्रभावळकर, आशुतोष सावंतप्रभावळकर, बाबू सावंतप्रभावळकर, स्वप्नील सावंतप्रभावळकर, मनीष सावंतप्रभावळकर, संजय सावंतप्रभावळकर हे सर्वजण नऊ दिवसाचा कार्यक्रम दिमाखात साजरा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्यरत असतात. 

प्रभावळकर घराण्याचा दसरा आताच्या म्हैसूरच्या दसऱ्याची आठवण करून देणारा होता. शस्त्रे तयार करून त्याची पूजा करून स्वारीवर निघण्याचा शुभमुहूर्त म्हणजे दसरा. मराठ्यांच्या भाग्याचा दिवस म्हणजे दसरा. मुलूखगिरी केल्याशिवाय त्या काळात संपत्ती मिळविणे कठीण होते. दसरा आटोपून प्रभानवल्लीकर विजापूरच्या दरबारात हजर होत, नंतर पानाचे पान देऊन प्रभानवल्लीकरांकडे एखाद्या मोहिमेचे कार्य सुपूर्द करण्यात येत असे. हा दसरोत्सव आजही साजरा होतो. 
- सुभाष सावंतप्रभावळकर  

संपादन - राहुल पाटील

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival at Kudal