रत्नागिरीत शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी थोपटणार दंड 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (ता. 5) रत्नागिरीत झाली. यावेळी कुमार शेट्ये, राजाभाऊ लिमये, सुदेश मयेकर यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी - राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत अशक्‍य असून राष्ट्रवादीने शिवसेनेविरोधात स्वतंत्र लढण्यावर शिक्‍कामोर्तब केला आहे. एबी फॉर्म मिळाला तर मिलिंद कीर पक्षाच्या चिन्हावर लढतील अन्यथा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यांवर अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरणार आहेत. कॉंग्रेसने उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून मनसेनेही रुपेश सावंताचे नाव जाहीर केले. भाजपकडून राजू कीर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केल्याने ही निवडणुक बहुरंगी होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (ता. 5) रत्नागिरीत झाली. यावेळी कुमार शेट्ये, राजाभाऊ लिमये, सुदेश मयेकर यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला रत्नागिरीतील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत कायम ठेवण्याच्या सूचना असल्याचे स्थानिकांना सांगण्यात आले होते; मात्र शहरविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय आधीच झाला असल्याचे ठाम मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यासाठी एबी फॉर्म मिळावा मागणी पक्षाकडे करण्यात आली. एबी फॉर्म देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पक्षाने पाठबळ दिले नाही, तरीही अपक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरण्यावर मिलिंद कीर ठाम आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि ही पोटनिवडणूक असल्याने ती लढविण्याची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. जिल्हा नेतृत्त्वापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - कशामुऴे हे गाव पडले ओस..

काँग्रेसही देणार स्वतंत्र उमेदवार

राष्ट्रवादीपाठोपाठ कॉंग्रेसकडूनही स्वतंत्र उमेदवार उतरवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. रमेश शहा यांचे नाव पुढे असून माजी उपाध्यक्ष बाळा मयेकरही इच्छुकांच्या यादीत आहेत. शहर विकास आघाडीत असलेल्या मनसेनेही उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन रुपेश सावंत हे मनसेकडून अर्ज भरणार असल्याचे सांगितले. भाजपच्या उमेदवाराचा निर्णय जवळजवळ निश्‍चित झाला असून आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 7) नाव जाहीर होईल. राजीव कीर यांना हिरवा कंदिल मिळण्याची दाट शक्‍यता आहे. भाजपकडून राजेश सावंत यांचे नाव आघाडीवर आहे. पाठोपाठ ऍड. भाऊ शेट्ये हे इच्छूकांमध्ये आहेत. 

हेही वाचा - अबब ! गोकुळचे दुध संकलन दोन लाखांनी घटले 

तीन दिवसात एकही अर्ज नाही 

उमेदवारी अर्ज 4 डिसेंबरपासून भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. तिन दिवसात एकही अर्ज भरण्यात आलेला नाही. 12 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. उमेदवार निश्‍चित नसल्यामुळे सोमवारपासून (ता. 9) अर्ज भरण्यासाठी सुरवात होईल अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Oppose Shiv sena In Ratnagiri City President By Election