नाणार रिफायनरीला भाजपनंतर आता 'या' पक्षाचा पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

राजापूर विधानसभा मतदारसंघात जसे नोकऱ्या देणारे उद्योग येत आहेत तसेच उद्योग उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघातही आणावे. दुसऱ्या मतदारसंघातील उद्योगांकडे लक्ष देऊ, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कीर यांनी लगावला.

रत्नागिरी - नाणार रिफायनरीतून 1 लाख रोजगार तर 20 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अशावेळी शिवसेनेचा विरोध का? नोकऱ्या मिळाल्यानंतर आणि रोजगार उपलब्ध झाल्यानंतर कार्यकर्ते मिळणार नाहीत, या भीतीने चुकीचे राजकारण करू नये. या प्रकल्पांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे,असे प्रतिपादन मिलिंद कीर यांनी केले. 

येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजापूर विधानसभा मतदारसंघात जसे नोकऱ्या देणारे उद्योग येत आहेत तसेच उद्योग उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघातही आणावे. दुसऱ्या मतदारसंघातील उद्योगांकडे लक्ष देऊ, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कीर यांनी लगावला. यावेळी कुमार शेट्ये, निलेश भोसले आदी उपस्थित होते.

कीर म्हणाले, जिल्ह्याच्या 2011 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 2001 च्या जनगणनेच्या तुलनेत घटली आहे. नोकरी, रोजगार नसल्याने प्रामुख्याने तरूण मंडळी आणि कर्त्या व्यक्तीने कामधंद्यासाठी आपले घरदार सोडले आहे. अशावेळी रत्नागिरीचे आमदार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजापूर मतदार संघातील उद्योगांच्या विरोधात जाणे संयुक्तीक नाही. उदय सामंत गेल्या 16 वर्षापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. निवळी पंचतारांकित एमआयडीसी, वाटद खंडाळा येथील स्टील उद्योग येऊ शकले नाहीत. उच्च तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा भूमिकेतून नोकरी, रोजगाराची संधी उपलब्ध होईल का? याचा विचार सामंत यांनी करावा. 

राजापूर विधानसभा मतदारसंघात जसे नोकऱ्या देणारे उद्योग येत आहेत तसेच आमदार सामंत यांनी मतदारसंघातही उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. नाणार रिफायनरी कमी प्रदुषणकारी आहे. त्यामुळे राजापुरातील या उद्योगांना आमचा पाठिंबा असून, त्याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याचे अर्थकारण आधीच बारगळले आहे. आंबा आणि मत्स्य उद्योग निसर्गाच्या लहरीपणामुळे उद्ध्‌वस्त होत आहेत. अशावेळी हाताला काम देणाऱ्या उद्योगांची पाठराखण करणे आवश्‍यक असल्याचेही कीर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Support Nanar Refinery Project Ratnagiri Marathi News