राजापूर पंचायत समितीत उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीची पाचर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

शिवसेनांतर्गत झालेल्या निर्णयानुसार येत्या काही दिवसांमध्ये पंचायत समितीतील विद्यमान उपसभापती प्रकाश गुरव राजीनामा देण्याची शक्‍यता आहे.

राजापूर  ( रत्नागिरी ) - राज्यामध्ये शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडी असून आघाडीचा घटक पक्ष म्हणून उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीला संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य आबा आडीवरेकर यांनी केली आहे. त्यामुळे येथील पंचायत उपसभापती पदाच्या निवडीत राजकीय रंग भरू लागले आहेत. या मागणीमुळे शिवसेनेपुढे अडचण उभी राहिली आहे. 

शिवसेनांतर्गत झालेल्या निर्णयानुसार येत्या काही दिवसांमध्ये पंचायत समितीतील विद्यमान उपसभापती प्रकाश गुरव राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असताना उपसभापतीपदाच्या संभाव्य निवडणुकीचे साऱ्यांना आता वेध लागले आहेत. बारा सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. बारापैकी नऊ शिवसेनेचे, दोन राष्ट्रवादी तर एक कॉंग्रेसचा सदस्य आहेत. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी सर्व सदस्यांना संधी मिळावी म्हणून सत्ताधारी शिवसेनेने पक्षांतर्गत काही निर्णय घेतले आहेत.

त्यामध्ये सव्वा वर्षासाठी सभापती आणि उपसभापती म्हणून संधी देण्याचे निश्‍चित करण्यात आले. शिवसेना पक्षांतर्गत झालेल्या निर्णयानुसार सेनेच्या विशाखा लाड यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यानंतर, येत्या काही दिवसांमध्ये उपसभापती गुरवही राजीनामा देणार आहेत. त्यामुळे उपसभापतीपदाच्या संभाव्य निवडीच्या अनुषंगाने आतापासूनच राजकीय रंग भरू लागले आहेत. 

राज्यामध्ये शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी अशा पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीला संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आडीवरेकर यांनी केली आहे. 

शिवसेना राष्ट्रवादीला संधी देणार का ? 
शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची राज्यामध्ये महाविकास आघाडी असली तरी त्याचे प्रतिबिंब तालुक्‍याच्या राजकारणामध्ये दिसत नाही. तालुक्‍याच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून पंचायत समितीमध्येही शिवसेनेचे एकहाती सत्ता आहे. अशा स्थितीमध्ये राज्याच्या राजकारणात असलेला महाविकास आघाडीचा धर्म पाळून शिवसेना उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीला संधी देणार का, हा पाहणे औत्सुक्‍याचा विषय आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Wedge For Post Of Deputy Chairman In Rajapur Panchayat Samiti