काजू, आंब्याला विमा संरक्षण हवे आहे; मग हे जरूर वाचा

Needs Insurance Protection For Cashew Nut Mango The Read
Needs Insurance Protection For Cashew Nut Mango The Read

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा व काजू पीक वारंवार धोक्‍यात येत आहे; मात्र या पिकांचे अत्यल्प क्षेत्र विमा संरक्षणाखाली असल्याने सर्वसामान्य बागायतदार आर्थिक अडचणीत आहेत. जिल्ह्यात 32 हजार 300 हेक्‍टर क्षेत्र आंबा पिकाखाली असताना यातील 9 हजार 998 हेक्‍टर 48 एकर क्षेत्र संरक्षित झाले आहे. काजूचे 71 हजार हेक्‍टर क्षेत्र असताना 3 हजार 306 हेक्‍टर 45 एकर एवढेच क्षेत्र संरक्षित केले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कणा म्हणजे आंबा, काजू उत्पादन. या उत्पादनाच्या जोरावर येथील नागरिक पावसात लागणाऱ्या धान्याची, आर्थिक गरजेची पूंजी जमा करून ठेवत असतात; मात्र यावर्षी हा कणाच मोडला गेला आहे. 2019 च्या जुलैमध्ये सुरू झालेली नैसर्गिक आपत्ती 2020 मध्येही थांबण्याचे नाव घेत नाही. 2019 मध्ये पावसाने हाता - तोंडाशी आलेला घास पळविला होता. भातपिक नष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडे मदतीची याचना करावी लागली. आता वारंवार होणाऱ्या तापमान बदलाने बागयदारांना घाम फुटला आहे. डिसेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर एकदाही आंबा व काजू झाडासाठी पोषक वातावरण तयार झाले नाही. दोन दिवस कडाक्‍याची थंडी पडल्यावर आता झाडांना मोहोर येईल; पण पुढच्या दोन दिवसात खार पडायची आणि वातापरणातील पारा वाढायचा. मार्च अर्धा संपलातरी अजुन आंबा, काजू उत्पादनाचा पत्ता नाही. या एकंदरित वातावरणाचा अभ्यास केल्या दरवर्षी मिळणाऱ्या उत्पादनाच्या सरासरी 25 टक्केच आंबा व काजू उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. 9 मार्चला झालेल्या कृषी समितीच्या सभेत यावर सविस्तर चर्चा होवून बदलत्या वातावरणाचे नेमके कारण काय ? याचा अभ्यास करण्यासाठी कोकण विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

भारत सरकारने गारपीट, अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान यामुळे बाधित होणाऱ्या पिकांसाठी संरक्षित करण्यासाठी हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजना सुरु केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व केळी या पिकांसाठी ही योजना लागू आहे. यात आंबा पिकाच्या एका हेक्‍टरसाठी 6 हजार 50 रुपयांचा विमा उतरविल्यास 1 कोटी 21 हजारच्या आतमध्ये विमा रक्कम मिळते. गारपीट होवून नुकसान झाल्यास विमा संरक्षित 1 लाख 21 हजार व गारपीटसाठी 2 हजार 17 रूपये भरून संरक्षित केल्यास नुकसान रक्कम 40 हजार 333 रूपये एवढी नुकसानी ही विमा कंपनी देते. काजूसाठी हेक्‍टरी 4 हजार 250 रूपये भरल्यास 85 हजार रूपये रक्कम संरक्षित होते. गारपीटसाठी संरक्षित केल्यास 28 हजार 333 रूपये नुकसानी मिळते; मात्र गारपीट झाली तरच हा लाभ देण्यात येतो. यासाठी विमा रक्कम भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदत होती. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 32 हजार 300 हेक्‍टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. यातील केवळ 9 हजार 998 हेक्‍टर 48 एकर क्षेत्राचे आंबा पीक संरक्षित केले आहे. 12 हजार 596 आंबा बागायतदार यांचा यात समावेश असून 6 कोटी 4 लाख 87 हजार रूपये एवढी विमा रक्कम भरली आहे. तसेच जिल्ह्यात 71 हजार हेक्‍टरवर काजू लागवड असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यातील केवळ 3 हजार 306 हेक्‍टर 45 एकत्र क्षेत्राचा विमा उतरविलेला आहे. 4 हजार 627 शेतकऱ्यांचा यात समावेश असून 1 कोटी 40 लाख 52 हजार रुपयांचा एकूण विमा उतरविलेला आहे. जिल्ह्यातील आंबा व काजूचे एकूण क्षेत्र व विमा काढण्यात येणाऱ्या क्षेत्राची संख्या याचा अभ्यास केल्यास जिल्ह्यातील शेतकरी अजुन पीक विम्याचा लाभ घेण्यास इच्छुक नसुन निसर्गाच्या कृपेने मिळेल तेवढे पीक पदरात घेण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. 

असे मिळते विमा संरक्षण 

आंबा पिकासाठी 1 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत एक दिवस अवेळी पाऊस झाल्यास हेक्‍टरी 6 हजार 50 रूपये. 2 दिवस पाऊस पडल्यास 10 हजार 900 रूपये विमा रक्कम मिळते. 1 एप्रिल ते 15 मे 2020 या काळात कोणत्याही दिवशी अवेळी पाऊस 25 मिलीमीटर पेक्षा जास्त पडल्यास एका दिवसासाठी 13 हजार 300 रूपये दिले जातात. यासाठी जास्तीत जास्त 24 हजार 200 रूपये नुकसानी दिली जाते. 1 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत 13 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान सलग तीन दिवस राहिल्यास 4 हजार 300 रूपये, 4 दिवस राहिल्यास 8 हजार 580 रूपये, 5 दिवस राहिल्यास 12 हजार 200 रूपये, 6 दिवस राहिल्यास 16 हजार 500 रूपये तर 7 दिवस राहिल्यास 24 हजार 200 रूपये हेक्‍टरी दिले जातात. तसेच 37 किंवा त्यापेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस तापमान 1 मार्च ते 15 मे या कालावधीतील कोणतेही सलग तीन दिवस राहिल्यास 12 हजार 200 रूपये. 4 दिवासांसाठी 24 हजार 400 रूपये, 5 दिवसांसाठी 36 हजार 300 रूपये, 5 दिवसांसाठी 48 हजार 400 रूपये हेक्‍टरी दिले जातात. गारपीट विमा उतरविला असल्यास आणि गारपीट झाल्यास 1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीसाठी 40 हजार 333 रूपये जास्त रक्कम संरक्षित केली जाते. 16 एप्रिल ते 15 मे 2020 या कालावधित कोणत्याही दिवशी 25 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा झाला तर 14 हजार 300 रूपये आणि 25 किमी पेक्षा वेगाचे वारे झाल्यास 24 हजार 200 रूपये विमा मिळणार आहे. काजुसाठी 5 किंवा त्यापेक्षा जास्त मिमी पाऊस 1 डिसेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत झाला असतातर एका दिवसासाठी 11 हजार 50 रूपये, 2 दिवसांसाठी 22 हजार 100 रूपये, 3 दिवसांसाठी 38 हजार 640 रूपये, 4 दिवसांसाठी 55 हजार 250 रूपये हेक्‍टरी मदत मिळणार होती. 1 डिसेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत 13 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास सलग 3 दिवसांसाठी 11 हजार 900 रूपये, 4 दिवसांसाठी 17 हजार 850 रूपये, 5 दिवसांसाठी 29 हजार 750 रूपये रक्कम मिळणार आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल या काळात गारपीट झाल्यास 28 हजार 333 रूपये मिळणार आहेत. 

गतवर्षी आंबा पिकाला साडेचौतीस कोटीचा विमा 

जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार यांनी फळपीक विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष केला असला तरी गेल्या पाच वर्षात वातावरणातील बदलाने नुकसान झालेल्या व फळपीक विमा उतरविलेल्या हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. 2018 - 19 यावर्षी 7 हजार 297 बागायतदारांनी तब्बल 34 कोटी 45 लाख 40 हजार एवढी विमा रक्कम घेतली आहे. काजुसाठी सुद्धा यावर्षी 2 हजार 33 शेतकऱ्यांनी 4 कोटी 40 लाख 51 हजार एवढी रक्कम घेतली आहे. 2014 - 15 पासून पीकविमा रक्कम मिळत असून या पाच वर्षात आंबा विमा 27 हजार 461 शेतकऱ्यांनी 95 कोटी 18 लाख 60 हजार तर काजू विमा 4 हजार 279 शेतकऱ्यांनी 5 कोटी 84 लाख 50 हजार रूपये एवढा घेतला आहे. त्यामुळे आंबा व काजू विमा प्रतिवर्षी काढणे सुरक्षेचे आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com