कोरोनाही रोखू शकला नाही त्यांची भक्ती; रुमवरच केली तरुणांनी गणरायाची प्रतिष्ठापना...कुठे घडले वाचा...

रुपेश हिराप
Sunday, 23 August 2020

गणपतीसाठी गावी येणेही अशक्‍य झाले, ही हूरहूर त्यांच्या मनात होती.

सावंतवाडी : म्हणतात ना की देवावर फक्‍त श्रध्दा पाहिजे मग तो आपली सर्व इच्छा पुर्ण करतो. हीच भावना मनात ठेवत गणराया प्रती असलेली आपली श्रध्दा गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील युवकांनी दाखवून दिली. कोरोनामुळे गावी येता आले नाही म्हणून त्यांनी नाराज न होता गोव्यात रुमवरच दीड दिवसाच्या गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करत गणेशोत्सव साजरा केला. शिवाय गणराया चरणी कोरोनाच्या संकटातून देशाला मुक्त कर, अशी प्रार्थना केली. 

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमेश परब (शिरोडा), महेश धर्णे (आडेली), महेश नाईक (विलवडे), अक्षय साळगावकर (सोनुर्ली), सखाराम चराटकर (मळेवाड), सागर सावंत (तळवडे), अंकुश कोळेकर (रांगणातुळसुली), चंद्रकांत पुते (पावशी), सिध्देश परब (न्हावेली),र्‌ न्न्‌ंऋषिकेष पाटकर (मालवण कट्‌टा), प्रशांत अपराज (आचरा), बंड्या परब (शिरोडा) विनोद परब, प्रमोद परब, सागर कवठणकर, राहुल कवठणकर, प्रज्योत घाडी, संदेश घाडी, राहुल कवठणकर (सर्व रा. कालेली) आदींचा समावेश आहे. 

गोव्यात अनेक युवक-युवती तसेच तरुण नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. कोरोनामुळे काही नियम व अटी लागू आहेत. गावात आल्यावर विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसाचा आहे. एवढे दिवस सुट्टी नसल्याने अनेकांनी आहे तिथेच राहणे पसंत केले. मुंबई, पुणे, गोवा आदी भागात नोकरीनिमित्त असलेल्यांची संख्या मोठी आहे. गणपतीसाठी गावी येणेही अशक्‍य झाले. लाडक्‍या बाप्पाची सेवा करता आली नाही, याची खंत त्यांच्या मनात आहे. 

गोवा-वेर्णा येथे विविध कंपनीमध्ये कामाला व एकत्र एका रुममध्ये राहणाऱ्या जिल्ह्यातील काही युवकांनी मात्र युक्ती लढविली. घरच्या गणपतीची सेवा करता आली नसती तरी रुमवरच त्याची सेवा केली. तेथेच मूर्ती स्थापन करुन विधीवत गणेशोत्सव साजरा केला. फक्त गणरायाची पुजा करण्या ईतपत त्यांचा हा खटाटोप नव्हता तर गणरायाच्या आवडत्या मोदकाच्या नैवद्यासह पंचपंक्कवानही त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवत तो गणरायाला दाखविला. आरती, भजन आदी सर्व सोपस्कार त्यांनी पुर्ण केले आणि गावी येता न आल्याची खंत भरुन काढली. 

गावात आल्यावर 14 दिवस विलगीकरणात राहायचे म्हटले तर इकडे कामावरुन सुट्टी मिळत नव्हती. पुन्हा गोव्यात येऊनही विलगीकरणात राहावे लागत असल्याने आम्ही सर्वांनी गोव्यात राहणे पसंत केले होते. येथून आम्ही केलेली बाप्पाची सेवा ही घरच्या गणपतीचीच सेवा होती. त्यामुळे गावी येता आले नाही, याची तुसभरही खंत नाही. 
- अक्षय साळगावकर, सोनुर्ली 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neither Corona could stop his devotion; ... Read where it happened ...