सिंधुदुर्गात दिवसात दहाजण कोरोनाबाधित, दोघे आमदारांच्या संपर्कातील

विनोद दळवी
Wednesday, 22 July 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण संख्या 290 वर पोहोचली आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी नव्याने 10 कोरोना बाधित आढळले. यात कणकवली आणि कुडाळ तालुक्‍यातील प्रत्येकी पाच रूग्णांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील तिघे बाधित आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आले होते.

जिल्ह्यातील रुग्ण संख्या 290 वर पोहोचली आहे. आज आणखी तीन रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्तांची संख्या 244 झाली. सक्रिय रुग्ण संख्या 40 आहे. कुडाळ शहरातील दोन बाधित पूर्वी आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. वर्दे येथील दोन तर पावशी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कणकवली शहरातील बिजलीनगर येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. यात आमदार नाईक यांच्या दोन नातेवाईकांचा समावेश आहे. तेलीआळी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हा रुग्ण बाधिताच्या संपर्कातील आहेत. हरवळ आणि कलमठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून यात आमदार नाईक यांच्या स्विय्य सहाय्यकाचा समावेश आहे.

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 116 कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 4 हजार 860 झाली आहे. यातील 4 हजार 755 नमूने प्राप्त झाले आहेत. अजुन 105 नमूने अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील 4 हजार 470 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 290 अहवाल बाधित आले आहेत. बाधित पैकी 244 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. पाच व्यक्तिची दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 40 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 67 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 25 कोरोना बाधित आणि 32 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 3 कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 7 कोरोना बाधित उपचार घेत आहेत. दरम्यान बुधवारी आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील 3 हजार 650 व्यक्तींची आरोग्य तपासणी झाली. त्यात कोणालाही कोरोनाचे लक्षण नव्हते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 636 व्यक्ती वाढल्या

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 636 व्यक्ती वाढल्या. तेथे 15 हजार 742 व्यक्ती आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये 5 जण वाढल्याने येथील संख्या 61 झाली आहे. गाव पातळीवरिल संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 598 वाढल्याने येथील संख्या 12 हजार 567 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 34 व्यक्ति वाढल्या असून येथील संख्या 3 हजार 115 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 1 हजार 826 व्यक्ती दाखल झाल्याने 2 मे पासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या 1 लाख 44 हजार 375 झाली आहे.

नोडल अधिकारी पदाची सीईओंकडे जबाबदारी

जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या चाचण्या, प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी व प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

कुडाळ शहरात कंटेन्मेंट झोन

कणकवली बिजलीनगर येथील आमदार वैभव नाईक यांच्या घराजवळील 100 मीटर परिसरमधील 9 घरे, 6 कुटुंबे व 19 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर कुडाळ शहरात भैरववाडी परिसरात 800 मीटर परिसर कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे. तर कुडाळ तालुक्‍यातील वर्दे वरची पालववाडीमध्ये 500 मीटर परिसर कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या झोनमध्ये सर्व व्यवहार बंद राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 10 covid positive in sindhudurg district