
गेल्या काही वर्षामध्ये निसर्गासह हवामानामध्ये सातत्याने होणार्या बदलाचा परिणाम होऊन मान्सूनचेही चित्र बदलताना दिसत आहे. त्यामध्ये तापमानवाढीसह चक्रीवादळांचाही तडाखा बसू लागला आहे. पावसाची अनियमितता वा बदलाचा भातशेतीसह आंबा, काजूपिकांवर परिणाम होतोय. त्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण बिघडू लागले आहे. पाऊस अन् वातावरणातील बदल भविष्यामध्ये कायम राहणार असल्याने आता त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे. बदलत्या वातावरणामध्ये कृषी क्षेत्रातील किफायतशीर शेतीने निर्माण होणारे अर्थकारणातील सकारात्मक बदल टिकवण्यासाठी आणि त्यात सातत्य राखण्यासाठी कोकणातील शेती, बागायतींबाबत संशोधनाची आवश्यकता आहे. त्यात शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेले बदल लक्षात घेऊन कृषी विद्यापिठाने पुढाकार घेतला पाहिजे. काही शेतकऱ्यांनी वातावरणातील बदल आणि हवामानखात्याचे अंदाज याला तोंड देईल अशी शेती करायला सुरवात केली आहे. अशा स्थानिक शहाणपण अथवा स्थानिक हुशारीचा आदर करत उपाय करायला हवेत. खासगी नोकरशाही आणि संशोधक प्राध्यापक मंडळींचे अहं. या पलिकडे जाऊन विचार व्हायला हवा.......!
- राजेंद्र बाईत, राजापूर