नव्या शेतकरी कायद्याविरोधात सावंतवाडीत धरणे 

भूषण आरोसकर
Sunday, 17 January 2021

निवेदनात म्हटले आहे, की किसानविरोधी कायद्याच्या विरोधात किसान मजदूर मोर्चाच्या माध्यमातून दिल्ली, सिंधु बॉर्डर, शहापूर बॉर्डर तसेच गाजीपूर बॉर्डर याठिकाणी किसानविरोधी कायदा मागे घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्याला मारक ठरणारा हा कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. 
देशभरात आज आंदोलन सुरू असल्याचे जिल्हा संयोजक जाधव यांनी सांगितले. याआधी निवेदनातून इशारा देण्यात आला होता. 

निवेदनात म्हटले आहे, की किसानविरोधी कायद्याच्या विरोधात किसान मजदूर मोर्चाच्या माध्यमातून दिल्ली, सिंधु बॉर्डर, शहापूर बॉर्डर तसेच गाजीपूर बॉर्डर याठिकाणी किसानविरोधी कायदा मागे घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे 550 जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी 11 ते 17 जानेवारीपर्यंत शृंखलाबद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. जर शेतकरीविरोधी कायदा मागे घेतला नाही तर देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

शासनाने योग्य विचार करून कायदा मागे घ्यावा, तसेच आंदोलन शांततेने होण्यासाठी सहकार्य करावे, असे निवेदनातून सूचित केले होते. तसेच, येथील उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांना आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती. या वेळी किसान मोर्चा संयोजक सिंधुदुर्ग सगुन जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे संयोजक राजीव कदम, कृष्णा जाधव, संकेत कुडाळकर, अनिकेत जाधव, आत्माराम जाधव, महादेव जाधव, अविनाश गावकर, सिद्धी जाधव, प्रेरणा जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new farmers act issue Movement Sawantwadi konkan sindhudurg