esakal | मिश्र शेतीचा न्यू फंडा: ठेकेदारीचा व्यवसाय सोडून 20 गुंठ्यावर केला मठबुद्रूकमध्ये नविन प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

मिश्र शेतीचा न्यू फंडा: ठेकेदारीचा व्यवसाय सोडून 20 गुंठ्यावर केला  मठबुद्रूकमध्ये नविन प्रयोग

मिश्र शेतीचा न्यू फंडा: ठेकेदारीचा व्यवसाय सोडून 20 गुंठ्यावर केला मठबुद्रूकमध्ये नविन प्रयोग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आचरा (सिंधुदुर्ग) : वाढता व्यवस्थापन खर्च आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड होत असताना मठबुद्रूक घाडीवाडी येथील मोहन सदाशिव वेंगुर्लेकर यांनी ठेकेदारीचा व्यवसाय सोडून कृषी सहाय्यक अय्याज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 20 गुंठ्यावर मिश्र शेतीची कास धरली आहे. संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या कलिंगडाची चव ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळेच कोरोना संकटात आठवडा बाजार बंद झाले तरी शेतात पिकलेला भाजीपाला घरोघरी विक्रीला चांगला प्रतिसाद मिळून आर्थिक फायदाही होत आहे.

यासाठी त्यांना स्वाभिमान बचतगटातील सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून पुढील काळात सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शेती करण्याचा मनोदय वेंगुर्लेकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. केवळ पावसाळी शेती असलेल्या मठबुद्रूक भागात उन्हाळी शेती ही फायदेशीर होवू शकते याचे गणित जुळवलेल्या कृषी सहाय्यक अय्याज शेख यांनी या भागात अजूनपर्यंत केली न गेलेली कलिंगड शेती करण्याचा मानस मोहन वेंगुर्लेकर यांना बोलून दाखविला. याबाबत वेंगुर्लेकर यांनीही अय्याज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कलिंगड शेती करण्याचे ठरविले. यासाठी ऑगष्टा, आईसबॉक्‍स या जातीच्या कलिंगडांची निवड केली.

लागवड गादी वाफ्यावर करण्यात आली. कलिंगडांना जास्त प्रमाणात पाणी लागत असल्याने शेवटपर्यंत पाणी पुरवठा होण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून गादी वाफ्यावर प्लास्टिक मल्चिंग करण्यात आले. याबाबत माहिती देताना कृषी विभागाचे अय्याज शेख सांगतात, या भागात प्रथमच कलिंगड लागवड केली जात असल्याने ही शेती धोक्‍यात येऊन नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ नये, या उद्देशाने कलिंगड शेतीमध्ये इतर भाजीपाला लागवड करत मिश्र शेतीचा अवलंब करायचे ठरवले. यासाठी मंजिरी जातीची वांगी, भेंडी, टॉमेटो, मिरची यांची लागवड करायचे ठरवले.

जमिनीची मशागत करून गादी वाफे तयार केले गेले. संपूर्ण शेतातच खतांचा वापर न करता वाफ्यावर ज्या भागात लागवड करायची आहे तेवढ्या भागातच लेंडी गांडूळ खत आणि जोरखतासाठी पावकिलो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला. सकस रोपे लागवडीसाठी मिळावी यासाठी सुवर्णा नार्वेकर यांच्या घराच्या गच्चीवर गांडूळ खत, लेंडी खत, भाताच्या तुसांचा वापर करून हायड्रोक्‍लोनिक मॅट वापरून रोपवाटिका तयार केली गेली. यामुळे लागवडीसाठी चांगल्या प्रतीची रोपे मिळाली.

गादी वाफ्यावर लागवड करताना कलिंगडाचे रोप त्यानंतर मिरची, पुन्हा कलिंगड टॉमेटो अशा प्रकारे एक सोडून एक याप्रमाणे लागवड केली गेली. लागवड 15 फेब्रुवारीला करण्यात आली. सध्या वेंगुर्लेकर यांच्या शेतात त्यांच्या परीश्रमाला यश मिळाल्याचे दिसत असून आईसबॉक्‍स जातीच्या कलिंगडाची साधारण अडीच ते तीन किलो होणारी कलिंगडे सहा ते सात किलो वजनाची झाली आहेत. या लागवडी बाबत बोलताना वेंगुर्लेकर सगळे श्रेय कृषी सहाय्यक अय्याज शेख आणि आपणास मदत करणारया स्वाभिमानी शेतकरी गटाच्या सहकारयांना देतात.

सध्या कोरोनामुळे दर कमी मिळत असला तरी शेतीतून समृद्धी येवू शकते हा विश्वास निर्माण झाला असून पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणात शेती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. एकूणच कोरोना संकटातही नविन संधीचा वापर करत मठबुद्रूक घाडीवाडी येथील वेंगुर्लेकर यांनी धुंडाळलेली मिश्र शेतीची वाट जमिन असूनही पडीक ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरू शकते.

किटकनाशकांसाठी वेगळा प्रयोग

या मिश्र शेतीत किटकनाशकांचा जास्त वापर न करता शेतामध्ये झेंडूची लागवड करुन साधारण दीड फूट उंचीचे काठ्यांचे अँटेना उभे केले गेले. ज्यामुळे पक्षी यावर बसून शेतातले किटक फस्त करत असल्याने किटकनाशकांचा अवास्तव होणारा खर्चही वाचला आणि चांगला सकस भाजीपालाही शेतात पिकवता आल्याचे शेख सांगतात.

Edited By- Archana Banage

loading image